आरक्षणप्रश्‍नी संघटना ‘मराठा क्रांती’च्या मूडमध्ये

सरकारविरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी नगरमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक

नगर – समाजाच्या आरक्षणप्रश्‍नी मराठा समाजातील विविध संघटना पुन्हा एकदा सरसावल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी सरकारला जाब विचारण्यासाठी राजकारण विरहित “मराठा क्रांती मोर्चा’ आयोजित केला होता. तीच भूमिका घेऊन पुन्हा राज्यभर रान पेटविण्याचा निर्णय घेण्याची भूमिका बहुतेक मराठा संघटनांची घेतली असून, त्यासाठी आज नगरमध्ये तीन ते चार तास मॅरेथॉन बैठक पार पडली. 

“एक मराठा… लाख मराठा’ हेच ब्रीद घेऊन पुन्हा एकदा “मराठा क्रांती’ घडविण्याच्या मूडमध्येच सहभागी कार्यकर्ते असल्याचे चित्र आज दिसले. शहरातील गुरुदत्त लॉन्सच्या आवारात आज दुपारी तीन वाजता बैठकीस प्रारंभ झाला. उशिरापर्यंत या बैठकीत आरक्षणप्रश्‍नी खल करण्यात आला.

बैठकीत सहभागी झालेल्या विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी सविस्तर भूमिका मांडली. त्यातील माहितगारांनी मराठा
आरक्षणासंदर्भात मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांपासून न्यायालयात पोचलेल्या मुद्यापर्यंत व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयापर्यंत सविस्तर खल केला. आरक्षण देण्याच्या मुद्यावर कोण चुकले? यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग खडतर झाला आहे.

आरक्षण मिळायलाच हवे, यासाठी काय लढाई करता येईल, यावरच भूमिका मांडण्याचा आग्रह या बैठकीत झाला. तसेच यापुढेही आरक्षणप्रश्‍नी राजकारण विरहित लढाई व्हायला हवी, यावर सर्वांचे एकमत झाले.

आमदारांच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त
सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नगर जिल्ह्यातील सर्वच आजी-माजी खासदार, आमदारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नगरमधील माजी खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोरही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक अधिकारी व तीन पोलिसांचा बंदोबस्त पथकात समावेश असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.