पाथर्डीत तोडले “राष्ट्रीय महामार्ग’चे कार्यालय

====
पाथर्डी  -राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पाथर्डी कार्यालयात गेले होते. यावेळी निवेदन घेण्यासाठी कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून राडा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन केले.

पाथर्डी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने त्यांचे रूपांतर डबक्‍यांत झाले आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे बुजविण्याची वेळोवेळी मागणी करूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या रस्त्यावरील डबक्‍यांमध्ये बेरोजगार तरुणांना मासेमारी करून पर्यटन व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, असे अनोखे निवेदन घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय गाठले.

मात्र कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यालयातील अभियंत्याच्या खुर्चीची मोडतोड करून तिला चपलांचा हार घातला. गेल्या तीन वर्षांपासून महामार्गाचे काम बंद आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. अधिकारी मात्र मस्त मौज करत आहेत. अधिकारी कार्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोप करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालय गाठून शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली. मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा फौजफाटा पालिका कार्यालयात दाखल झाला. खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. शहरातील खड्डे तत्काळ बुजवण्याचे आश्‍वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केले. यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाठ, शहर सचिव संदीप काकडे, राजू गिरी, सोमनाथ फासे, जयंत बाबर, गणेश कराडकर, एकनाथ सानप, संजय चौनापुरे, एकनाथ भंडारी, रंगनाथ वांढेकर, बाबासाहेब सांगळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.