पाण्याच्या नियोजनाअभावी शेती अडचणीत

हर्षवर्धन पाटील : परिवर्तनास साथ द्या.

नीरा नरसिंहपूर- इंदापूर तालुक्‍यात गेल्या 20 वर्षांमध्ये शेतीसाठी नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्याच्या पाण्याचे केलेले नियोजन, भीमा व नीरा नद्यांवर बांधलेले बंधारे, वीज उपकेंद्रांचे निर्माण केलेले जाळे यामुळे इंदापूर तालुक्‍यात शेतीची भरभराट झाली. मात्र, पाण्याच्या नियोजनाअभावी शेती अडचणीत आली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. इंदापूर तालुक्‍यातील टणू, गिरवी येथील विकासकामांच्या पायाभरणीप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते.

टणू येथील भर्तरीनाथ मंदिर येथे सभामंडपासाठी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या निधीतून 5 लाख रुपये व गिरवी येथे महादेव मंदिर सभामंडपासाठी स्व. जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधीतून 10 लाख रुपयांची कामे करण्यात येत आहेत.

पाटील म्हणाले, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या. वाड्यावंस्त्यांवर रस्त्यांचे जाळे निर्माण केले. युवकांना रोजगार उपलब्ध करणेसाठी लोणी औद्योगिक वसाहत व सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था तसेच साखर कारखानदारी उभी केली. मात्र, काही वर्षांत दूरदृष्टीने विकासाचे एकही काम झालेले नाही. त्यामुळे आगामी काळात तालुक्‍याच्या सर्वांगिण विकासाठी परिवर्तनास साथ द्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, इंदापूरचे तालुकाध्यक्ष ऍड. कृष्णाजी यादव, नीरा भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संजय बोडके, महादेव घाडगे, शंकरराव घोगरे मान्यवर उपस्थित होते. टणू येथील कार्यक्रमास नीरा भीमा कारखान्याचे संचालक प्रकाश मोहिते, सुभाष मोहिते, दादा पाटील, शरद जगदाळे, नाना पाटील, अंगद जगदाळे, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन भर्तरीनाथ मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र माहिते यांनी केले. यावेळी ज्ञानदेव क्षीरसागर, सरपंच रेखा कोरे,विद्या क्षीरसागर, पोपट कोरे, शिवाजी क्षीरसागर, मारूती क्षीरसागर, रामलिंग जगताप, विजय क्षीरसागर व ग्रामस्थ उपस्थित होते. विश्वनाथ क्षीरसागर यांनी आभार मानले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×