पाणीटंचाईमुळे बंद पडले पोल्ट्रीफार्म

चिकनच्या दरात वाढ

मंचर- पाणीटंचाईमुळे पोल्ट्री शेड बंद ठेवण्याची दुर्देवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्याचा आर्थिक फटका पोल्ट्री शेड मालकांना बसला असून याचा परिणाम चिकनच्या दरावर झाला आहे. ऐन उन्हाळ्यात चिकनचे दर वाढले आहेत. किरकोळ विक्रेते चिकन 160 ते 170 रुपये किलोदराने विकत आहेत.

उष्णतेमुळे कोंबड्यांना पिण्याच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर असते. तसेच उन्हाळ्यात कोंबड्यांच्या मरीचे प्रमाणही जास्त असते. पाणी टंचाईमुळे अनेक पोल्ट्री शेड बंद करावी लागतात. तसेच उष्णतेमुळे कोंबड्या मृत होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे बाजारात कोंबड्यांची कमतरता जाणवत असल्यामुळे ग्राहकांना सध्या एक किलो चिकनला 160 ते 170 रुपये मोजावे लागत आहेत, अशी माहिती कळंब येथील ख्वाजा गरीब नवाज चिकन अँड एग्ज सेंटरचे मालक इसाक शेख यांनी दिली.

बाजारमध्ये कोंबड्यांची उपलब्धता नसल्यामुळे खरेदीदार होलसेल ट्रेडर्स बॉयलर कोंबडीला एक किलोला 90 ते 92 रुपये देवून कोंबड्या खरेदी करीत आहेत. किरकोळ चिकन व्यावसायिकांना पुरवठा करणाऱ्या व्यापारी वर्गाकडून घाऊक बाजारात एक किलोला 98 ते 99 रुपये बाजारभाव आकारला जात आहे. पोल्टी व्यवसायावरही दुष्काळाची चिन्हे जाणवू लागली आहेत. बहुतेक ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही तर पोल्टी शेडमधील कोंबड्यांसाठी पाणी कुठून येणार हा प्रश्‍न शेतकरी वर्गापुढे असल्याचे निरगुडसर येथील पोल्ट्री शेड मालक प्रकाश वळसे पाटील यांनी सांगितले.

  • तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न
    एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाची दाहकता तीव्र जाणवू लागली आहे. नागरिकांना पिण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. बहुतांशी ठिकाणी नदी, विहिरी, कूपनलिकातील पाण्याने तळ गाठला आहे. पाणी उपलब्ध नसल्यामुळे बरेचसे पोल्टीफार्म पाण्याअभावी बंद पडू लागले आहेत. उन्हाळ्यात पोल्टीच्या सिमेंट पत्र्यांवर स्प्रिंकल लावून थंडावा निर्माण केला जातो. त्यामुळे पोल्ट्री शेडमधील उष्णतेचे तापमान नियंत्रित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.