पाणीच नाही तर आग विझवणार कशी?

कुरकुंभ अग्निशामक दलावरही पाणी खरेदीची वेळ

– विनोद गायकवाड

कुरकुंभ- कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतील अग्निशमन दलाकडे पाणीच नसल्याचे उघडकीस आले आहे.औद्योगिक वसहतीला पाणी पुरवठा करणारा व्हिक्‍टोरिया तलाव पूर्णपणे आटल्याने कित्येक दिवसांपासून येथील पाणी पुरवठा बंद आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र केमिकल झोन आहे. या भागात छोटे-मोठे आग लागण्यासारखे अपघात घडल्यानंतर सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती अग्निशामक दलाची. रासायनिक कंपन्यांमधील केमिकल कुठले आहे, त्याने शरीरावर काय विपरीत परिणाम होईल, याची पर्वा न करता जीवाची बाजी लावत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक केंद्र आपले कर्तव्य पार पाडत असते; परंतु महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठाच बंद असल्याकारणाने कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे, वापरायचे पाणी, तसेच कुठे आग लागली तर पाणीच विकत घेण्याची वेळ येथील अग्निशमन दलाला आली आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राकडे दोन फोम (बंब) असून दोन्ही मध्ये 4 जिार लिटर पाणी आणि 500 लिटर फोम मावेल एवढी क्षमता आहे. रासायनिक औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता 100 लिटर फोम हा प्रत्येक गाडीमध्ये उपलब्ध असतो.यामुळे या दोन्ही गाड्या (बंब) सुस्थितीत असून, कुठल्याही आगीच्या वर्दीवर जाण्यास सक्षम आहे. अग्निशमन अधिकाऱ्यांसह एकूण 13 कर्मचारी आगीच्या घटनांना सामोरे जाण्यास सदैव सज्ज असतात. आगीच्या घटना घडल्यास घाबरून न जाता आगीचे प्रमाण छोटे असेल तर प्राथमिक स्वरूपात आग आटोक्‍यात कशी आणता येईल, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हे अग्निशमन केंद्र करत आहे. अग्निशमन केंद्रातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी पूर्वी सहाच सदनिका उपलब्ध होत्या, यामुळे कर्मचाऱ्यांची राहण्याची गैरसोय होत होती; परंतु महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने 24 सदनिका बांधल्या असून, त्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण होत असल्याने येथील जवान एमआयडीसीच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर आहेत. मात्र, सर्व सुविधा असूनही सध्या पाण्याचीच कमतरता असल्याने या भागात काही अघटित घडल्यास पाणी विकत घेऊनच काम करावे लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • 2015 पासून आतापर्यंत आलेले आगीचे कॉल
    2015 – 09 कॉल, 2016 – 28 कॉल, 2017 – 23 कॉल, 2018 – 08 कॉल आणि जानेवारीपासून येत्या चार महिन्यांत एप्रिल 2019 पर्यंत 7 ते 8 कॉल.
  • सध्या एमआयडीसीचा पाणी पुरवठा बंद असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी, तसेच आगीच्या वर्दीच्या ठिकाणी जाण्यासाठी पाणी विकतच घ्यावे लागत आहे. कुरकुंभ औद्योगिक वसाहत हे रासायनिक औद्योगिक क्षेत्र लक्षात घेता कोणत्याही आगीच्या वर्दीवर पाण्याअभावी जीवितहानी किंवा वित्त हानी होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा.
    – सुधीर खांडेकर, अग्निशमन अधिकारी, कुरकुंभ अग्निशमन केंद्र

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.