पाटसला सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

वरवंड- दौंड तालुक्‍यातील पाटस येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी “एक मराठा, लाख मराठा’, “जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. शासन मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने शासनाचा निषेध आदोलकांच्या वतीने करण्यात आला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
पाटस येथे रास्तारोको आंदोलनावेळी रोटी, हिंगणी गाडा, वासुंदे, कुसेगाव, पडवी, पांढरेवाडी, बिरोबावाडी, पाटस पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी महामार्ग अडविला. यावेळी नितीन शितोळे, सत्वशिल शितोळे, विनोद कुरुमकर यांसह अनेक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक सुरज बंडगर आणि मंडल अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी स्विकारले. यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. राज्य सरकारने सकल मराठा समाजाच्या भावनांचा अंत पाहू नये. त्याकरीता सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने आरक्षण मिळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखून त्वरीत अंमलात आणाव्यात.

  • या आहेत मराठा सामजाच्या मागण्या
    मराठा समाज हा आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्‌या मागासलेला असल्याने समाजाला 16 टक्के आरक्षण तातडीने मिळावे. राज्य सरकारने जाहीर केलेली 72000 ची मेगा भरती जोपर्यंत मराठा समाजास शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत स्थगित ठेवण्यात यावी. राज्य मागास आयोगाकडून तातडीने अहवाल प्राप्त होण्यासाठी जलद गतीने आवश्‍यक तो पाठपुरावा करावा. मराठा मोर्चाच्या आंदोलनात शाहिद झालेले हुतात्मा स्व. काकासाहेब शिंदे आणि इतर यांच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने 50 लाख रूपयांची आर्थिक मदत करावी. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत समाविष्ट करून घ्यावे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. सकल मराठा समाजाच्या आंदोलन कर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. राज्य सरकारने सकल मराठा समाजाच्या परिस्थितीशी आणि भावनांशी खेळू नये. सकल मराठा समाजाच्या बाबतीत आंदोलन बदनाम करण्याचा हेतूने जाणीवपूर्वक चुकीची, बेजबाबदार आणि खोडसाळपणाची वक्तव्य करु नयेत आदी मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी दिले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)