पाटसच्या तरुणांनी भागवली वन्यजीवांची तहान

कुसेगावच्या वनभागातील पावणठ्यात सोडले 15 हजार लिटर पाणी

वरवंड – प्रचंड कडक उन्हामुळे सद्यःस्थितीत वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत, यामुळे वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आणि किरण आगवणे यांच्या सहकार्याने 15 हजार लिटर पाणी कुसेगाव येथील वनविभागाच्या हद्दीतील पाणवठ्यात सोडण्यात आले आहे.

यंदा दौंड तालुक्‍यातील जिरायती भागातील कुसेगाव, रोटी, हिंगणिगाडा, वासुंदे, पडवी, जिरेगाव या गांवांत पाणी टंचाईची मोठी समस्या आहेण या जिरायती भागातील गावांमध्ये वनविभागाचे राखीव क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात, तसेच या गावांच्या हद्दीत मोठ्या संख्येने हरीण, ससे, कोल्हे, लांडगे, यांसह सरपटणारे प्राणी आणि पक्षी मोठ्या संख्येने आढळून येतात. जिरायती भागातील ओढे, नाले, तळी पूर्णतः कोरडी पडली आहेत, यामुळे प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अनेकदा पाण्याच्या शोधात वन्यजीव शहरी भागात महामार्गावरून येत असताना त्यांना भरधाव वाहनांमुळे प्राण गमवावे लागले आहेत .

चिंकारासारखे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात, अशा जीवांना भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागते. वासुंदे नावानजीक काही दिवसांपूर्वी कोरड्या विहिरीत हरीण पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि अलीकडच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत.

वन्यप्राण्यांचे पाण्यावाचून होणारे हाल आणि अपघातांत त्याचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी पाटस येथील श्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने कुसेगाव येथील वनक्षेत्रातील पाणवठ्यात 15 हजार लिटर पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी पाणवठ्यात पाणी सोडण्यात येत आहे. या मंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढमाले, राहुल आव्हाड, किरण आगवणे, जकीरभाई तांबोळी, पोपट गायकवाड, लहू खाडे, गणेश गरदडे, संतोष कोळपे, हणमंतसिंह सोलंकी , शहाजी भागवत, राहुल शितोळे आदी उपस्थित होते .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.