पाच कोटीच्या खंडणीसाठी डॉक्‍टरचे अपहरण

फलटण, दि. 20 (प्रतिनिधी)- पाच कोटी रुपये खंडणीसाठी अपहरण केलेल्या फलटण येथील डॉ. संजय राऊत यांची पुणे ग्रामीण पोलिस दल, फलटण शहर पोलिस आणि सातारा पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत सुटका केली. बारामती तालुक्‍यातील काटेवाडीजवळ ही सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सातपैकी तिघा आरोपींना अटक केली आहे. पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान झालेल्या झटापटीत बारामती गुन्हे शोध पथकाचे दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.
इक्‍बाल बालाभाई शेख (रा. कोळकी ता. फलटण) अजहर अकबर शेख ( रा. भड़कमकरनगर, फलटण) महेश धनंजय पाटील( रा. काम्बलेश्वर ता. फलटण) या तिघा आरोपींना अटक केली असून किशोर आवारे, विशाल महादेव ठोंबरे (रा. फलटण), समीर भैय्या नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर), बाळा कुंभार (रा. कांबळेश्वर, ता. बारामती) हे फरार असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.
फलटण येथील सिद्धन्नाथ हॉस्पिटलचे डॉ. संजय कृष्णाजी राऊत यांचे खंडणीसाठी दि. 19 रोजी रात्री 10 च्या सुमारास ते लाइफ लाइन हॉस्पिटल मधुन घरी जात असताना सोनवलकर हॉस्पिटलसमोर मारहाण करुन अपहरण करण्यात आले होते. अपहरण कर्त्यानी स्विफ्ट कारमधून त्यांना डोळ्यावर पट्टी बांधून नेले. अपहरण केल्यानंतर त्यांच्या मोबाइलवरुन हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापकाला डॉक्‍टरांनी फोन करून 5 कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले एवढी मोठी रक्कम मागितल्याने व्यवस्थापकाला संशय आला अधिक चौकशी करता डॉ. राऊत हे कोठेच दिसत नसल्याने संशयावरून व्यवस्थापकाने अधिक चौकशी करून फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली अपहरणकर्त्यानी डॉक्‍टरांकड़े पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. फलटणमधील डॉक्‍टरांचे अपहरण झाल्याने फलटण शहर पोलिसांनी चक्रे गतिमान करुन तपास यंत्रणा राबविली जिल्हा पोलिस प्रमुखांच्या आदेशानुसार पोलिस पथके तयार करण्यात आली. मोबाईल लोकेशनवरुन आरोपी बारामती भागाकड़े गेल्याचे समजताच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. डॉक्‍टरांच्या मोबाईल फोनवरूनच खंडणीसाठी फोन केला जात होता. त्यामुळे आरोपींचे लोकेशन काढणे पोलिसांना सोपे झाले. हे आरोपी बारामती परिसरात असल्याचे लक्षात आल्यावर बारामती येथील अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या गुन्हे शोध पथकाला याची माहिती देण्यात आली. बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पोलिसांना फलटण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला मदत करण्यास सांगितले. सर्वांनी संयुक्त शोध मोहिम सुरु केली
आरोपींनी सुरुवातीला बारामती शहरातील महालक्ष्मी शोरुमजवळ पैसे घेवून बोलावले होते. त्यानंतर ठिकाण बदलत बदलत आरोपींनी काटेवाडी (ता. बारामती) जवळ बोलावले. या ठिकाणी बारामतीचे गुन्हेशोध पथक, फलटण शहर पोलिस ठाणे, सातारा एलसीबी यांनी काटेवाडीजवळ सापळा लावला. आणि आरोपींच्या गाडीवर छापा टाकला यावेळी अंधाराचा फायदा घेवून चार आरोपी फरार झाले. तर तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. या झटापटीत बारामतीचे पोलिस कर्मचारी अभिजित एकशिंगे, दशरथ कोळेकर हे जखमी झाले. डॉक्‍टरांची सुखरूप सुटका करण्यात आली.
पकडलेल्या तिघा आरोपीना फलटण येथे आणण्यात आले येथे सातारा जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटिल यांनी सर्व घटनेचा आढावा घेऊन फरारी आरोपींचा शोध आणि अधिक तपासासाठी मार्गदर्शन केले. कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटिल यांनी पोलिसांना 35,000 रूपयांचे बक्षिस ज़ाहिर केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.