पाकिस्तानात मुशर्रफ होणार सक्रिय

इस्लामाबाद :पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी देशांतर्गत नाराजी वाढू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुशर्रफ यांच्याशी संबंधित घडामोडीला महत्व आहे.

पाकिस्तानच्या सत्तेवरून 2008 मध्ये पायउतार व्हावे लागल्यानंतर 76 वर्षीय मुशर्रफ यांच्या विरोधात विविध खटले सुरू आहेत. ते खटले टाळण्यासाठी त्यांनी मार्च 2016 पासून दुबईत आश्रय घेतला. तिथून ते त्यांच्या ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल) या पक्षाची सुत्रे हलवत होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने वर्षभरापासून ते निष्क्रिय होते. आता प्रकृती सुधारल्याने पक्षाचे कामकाज पुन्हा पाहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अर्थात, ते आधीप्रमाणेच दुबईतूनच पक्षाचे कामकाज पाहतील.

इतक्‍यात पाकिस्तानला परतण्याचा त्यांचा विचार नसल्याचे समजते. एपीएमएलच्या स्थापना दिनानिमित्त 6 ऑक्‍टोबरला इस्लामाबादेत कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून मुशर्रफ भाषण करणार आहेत. त्यातून ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. इम्रान यांना सत्तेतून हटवण्याच्या मागणीसाठी पाकिस्तानातील विरोधक एकवटू लागले आहेत. अशातच मुशर्रफ पुन्हा राजकारणाच्या आखाड्यात उडी घेण्यास सज्ज झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.