पश्‍चिम भागात महावितरणाच्या अनागोंदी कारभार

वायरमन नसल्याने संपूर्ण भागाची जबाबदारी शिकावू मुलांवर
दुर्गम भागात वायरमन मिळत नसल्याने शिकाऊ मुलांची अरेरावी

वाई, दि. 31 (प्रतिनिधी) – वाईच्या पश्‍चिम भागात गेल्या आठ दिवसापासून लाईट नसल्यामुळे संपूर्ण भाग महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा बळी ठरला आहे. गेल्या आठ दिवसांपासून या भागात अंधाराचे साम्राज्य आहे. मुख्य डीपीच्या बॉक्‍समध्ये फ्युज नसल्याने आठ दिवसांपासून लाईट गायब झाली आहे. फ्युज दुरुस्त करण्यासाठी लाईनमन बरोबर वायरमन नसल्याने या भागची संपूर्ण जबाबदारी ही त्या भागातील शिकाऊ मुलांवर आहे. गोळेवाडी पासून बोरगाव, दह्याट पर्यंत अनेक गावांमध्ये लाईटचा लपंडाव चालू असून याला सर्वस्वी महावितरणचा अनागोंदी कारभार जबाबदार आहे. वाईच्या पश्‍चिम भागाकडे वायरमनची नेमणूक न केल्याने या भागची संपूर्ण जबाबदारी निव्वळ शिकाऊ मुलांवर देवून महावितरणाने हात वरती केले आहेत. महावितरणकडे कामगार नसल्याने या ठिकाणी वायरमनची सर्व कामे शिकाऊ मुलेच करतात. कसलाही अनुभव नसलेल्या मुलांना लाईट दुरुस्तीसाठी खांबावर चढवून महावितरण त्यांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून कामगार नाहीत ही सबब पुढे करून महावितरण आपली जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळेच वाई तालुक्‍यात लाईट दुरुस्त करताना अनेक वेळ शिकाऊ कामगारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभाराविषयी पश्‍चिम भागतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरी या भागात लाईनमन बरोबर वायरमनची नेमणूक करून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवख्या कर्मचाऱ्यांची अरेरावीची भाषा

गेल्या आठ दिवसांपासून मुख्य डीपीतील फ्युज बसविण्यासाठी शिकाऊ मुलांकडे अनेक वेळ तक्रार करूनही त्याने कामात चुकारपणा करीत ग्रामस्थांनाच अरेरावीची भाषा वापरात आहे. महावितरण कामगार नसल्याने उपलब्ध असणाऱ्या शिकाऊ कामगाराला दुखवत नाही त्याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या भागातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या स्कीम पूर्णपणे बंद असून पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करून त्रास सहन करावा लागत आहे. बहरात आलेली शेतातील बागायती पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य डीपी बॉस्क उघडा पडला असून त्यात फ्युज न बसविता डायरेक्‍ट वायर जोडल्या आहेत. हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून या ठिकाणी एकदा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. महावितरणकडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. तरी या दुर्गम भागातील नागरिकांच्या सहन शिलतेचा अंत न पाहता त्वरित शिकाऊ कामगार हटवून प्रशिक्षित वायरमन ची नेमणूक करावी अन्यथा या भागातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून महावितरणाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)