पवना धरणग्रस्तांची “पाणीबाणी’!

पवनानगर : येथे धरणावर आंदोलनासाठी जमलेले धरणग्रस्त व कार्येकर्ते.
  • आंदोलकांची जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक : पाणीबंद आंदोलन 31 मे पर्यंत स्थगित

पवनानगर – पवनाधरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा निघत नाही, तोपर्यंत पवना धरणातून पाण्याचा एक थेंबही उचलू देणार नाही, या धरणग्रस्तांच्या भूमिकेमुळे सोमवारी (दि. 28) प्रशासन हालले. येत्या गुरुवारी (दि. 31) जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले असल्याचा सांगावा तहसीलदार रणजीत देसाई यांनी आंदोलकांपर्यंत पोहचवला. त्यानंतर आंदोलकांनी एक पाऊल मागे घेत चर्चेअंती पुढील निर्णय घेण्यावर एकमत केले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांशी होणाऱ्या बैठकीत आमच्या मागण्यांबाबत योग्य समाधान न झाल्यास “पाणीबाणी’चे हत्यार उपसण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

पवना धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि. 28) परिसरातील सर्व धरणग्रस्त, धरणग्रस्त संघटना, विविध राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक यांनी जोपर्यंत आमच्या मागण्याबाबत प्रशासन ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत पवना धरणावर जाऊन पिंपरी-चिंचवडसाठी एकही थेंब पाण्याचा जाऊन देणार नाही, असा पाणीबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता पवनानगर चौकात सर्व धरणग्रस्त व नागरिक एकत्र आले. पवनानगर चौकातून मोर्चा काढून पवना धरणावर नेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी धरणग्रस्त व शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा देत पवना धरणाच्या पायथ्याशी एकत्र येऊन पिंपरी-चिंचवडसाठी धरणातून जाणारे पाणी सोमवारी दुपारी 12.30 वाजता बंद करण्यात आले. याची दखल घेऊन मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांनी त्वरीत आंदोलकांची भेट घेतली. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; परंतु धरणग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि आम्ही जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी तयार असून त्यांनी आमच्याशी चर्चा करून ठोस आश्‍वासन द्यावे. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. त्यानंतर तहसीलदार देसाई यांनी त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी 31 मे बैठकीसाठी यावे त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे तहसीलदार रणजित देसाई यांनी दिल्यानंतर धरणग्रस्तांनी 31 मेपर्यंत आपले आंदोलन स्थगित केले.

आंदोलनाला विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा… 
या प्रकल्पासाठी 19 गावातील 2 हजार 394 हेक्‍टर क्षेत्र संपादित करण्यात आले. या प्रकल्पामुले 1 हजार 203 शेतकरी बाधीत झाले; त्यापैकी 340 प्रकल्पग्रस्थांना मावळ व खेड या भागात जमीनीचे वाटप करण्यात आले उर्वरित 863 प्रकल्पग्रस्त व 200 ज्यांचे अजूनही संकलीत यादीत नावे नाहीत, असे एकूण 1063 खातेदारांना अद्याप जमीनिचे वाटप करण्यात आलेले नाही. त्या जमीन मिळावी या व अन्य मागणीसाठी धरणग्रस्त गेल्या 50 वर्षांपासून लढा देत आहेत. याबाबत पवनाधरग्रस्त कृती समितीने उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबत उच्च न्यायलयाने उर्वरित खातेदारांचे पुर्नवसन ज्याप्रमाणे 340 खातेदारांचे पुर्नवसन केले आहे. त्याचप्रमाणे उर्वरित खातेदारांना वाटप करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, चंद्रकांत सातकर, तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, खंडुजी तिकोणे, माजी सभापती ज्ञानेश्‍वर दळवी, राष्ट्रवादीचे नेते महादु कालेकर, नामदेव ठुले, अनंता लायगुडे व शिवसेनेचे अमित कुंभार, भारिपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, रिपब्लिकनचे तालुका सरचिटणीस लक्ष्मण भालेराव, मनसेचे तालुका उपाध्यक्ष अनिल वरघडे, यांनी मनोगत व्यक्‍त करीत आंदोलनाला पाठींबा दर्शविला.

दोन्ही संघटनांची एकजूट
आजच्या आंदोलनात धरणग्रस्तांच्या हक्कासाठी पवनाधरणग्रस्त कृती समिती आणि पवनाधरणग्रस्त परिषद या दोन्ही संघटना एकत्र येत पवनाधरणग्रस्त संयुक्‍त समिती स्थापन करण्यात आली. हीच आजच्या आंदोलनाची सकारात्मक बाजू मानली जाते. तसेच 31 मे च्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे मुकुंदराज काऊर व रविकांत रसाळ यांनी सांगितले. या वेळी धरणाचे शाखा अभियंता मनोहर खाडे, विनायक पागे, मंडलाधिकारी प्रकाश बलकवडे व लोणावळा ग्रामीणचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रामदास इंगवले यांच्या वतीने या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)