#पर्यावरण : शाश्‍वत ऊर्जेचा पाठलाग करताना… 

अमोल पवार 

प्रदूषण, पर्यावरण ऱ्हास आणि जागतिक तापमानवाढीच्या पार्श्‍वभूमीवर अपारंपरिक ऊर्जास्रोतांना मोठे महत्त्व आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांनी दहा एकर जमीन भाड्याने घेऊन उभारलेला “सोलर फार्म’ आज अर्ध्या शहराला वीज देत आहे. दुसरीकडे पोर्तुगालने उभारलेला हायब्रीड हायड्रोइलक्‍ट्रिक, सोलर इन्स्टॉलेशनही कार्यरत झाला आहे. 

ऊर्जेची कमतरता विकासप्रक्रिया रोखून धरते. शिवाय, ऊर्जानिर्मितीचे औष्णिक ऊर्जेसारखे पारंपरिक स्रोत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पसरवितात. कार्बन उत्सर्जन वाढल्याने वातावरणात बदल होत असून, ऋतुचक्रही बिघडले आहे. वातावरणाची कार्बन शोषून घेण्याची क्षमता संपत आली असून, वातावरणात सोडलेला कार्बन शेकडो वर्षे तसाच राहत असल्यामुळे गंभीर धोके निर्माण झाले आहेत. पर्यावरणाच्या ऱ्हासाचे गांभीर्य ओळखून तसेच इंधनाचे साठे मर्यादित आहेत हे लक्षात घेऊन ऊर्जानिर्मितीसाठी अपारंपरिक स्रोतांचा वापर वाढविणे जगाला आवश्‍यक बनले आहे. हे गांभीर्य ज्यांनी ओळखले, त्यांनी जगापुढे आदर्श घालून दिले. त्यातील एक म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1979 मध्ये ते पदावर असताना अमेरिकेत भीषण ऊर्जासंकट निर्माण झाले होते. कार्टर यांनी त्याच वेळी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता आणि त्या दृष्टीने प्रबोधनही केले होते. पाणी गरम करण्यासाठी त्यांनी त्याच वेळी 32 सोलर पॅनेल बसविण्याची शिफारस केली होती. देशवासीयांशी बोलताना ते म्हणाले होते, “”पुढील पिढीसाठी हा सोलर वॉटर हिटर एक कुतूहलाचा भाग असेल आणि तो एक महान आणि उपयुक्त आविष्कार मानला जाईल.” कार्टर यांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट होता. आज आपण ज्या अक्षय ऊर्जेची चर्चा करतो, ते स्वप्न त्यांनी अनेक दशकांपूर्वी पाहिले होते. त्यांच्यानंतर राष्ट्राध्यक्ष झालेल्या रोनाल्ड रीगन यांनी हे सोलर पॅनेल हटविले होते. परंतु कार्टर यांनी आपल्या परिवारासह या विषयावर नियमित काम सुरूच ठेवले. परिणामी, आज केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगभरात सौरऊर्जेच्या अधिकाधिक वापरासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आपले ध्येय साध्य करण्यासाठी जिमी कार्टर यांनी त्यांच्या जॉर्जिया शहरात दहा एकर जमीन भाडेपट्ट्याने घेतली आणि त्यावर सौरशेती म्हणजे “सोलर फार्म’ सुरू केले. “सोलअमेरिका’ या सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने अखेर हा प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पाची ऊर्जानिर्मितीची क्षमता एवढी प्रचंड आहे की, निम्म्या शहराला या प्रकल्पातून वीज पुरविणे शक्‍य आहे. कार्टर यांनी आपल्या प्रेसिडेन्शियल लायब्ररीवरही 324 सोलर पॅनेल लावले आहेत. त्यामुळे त्या इमारतीच्या विजेची बहुतांश मागणी पूर्ण केली जाते. थोडक्‍यात सांगायचे झाल्यास कार्टर यांचा सोलर फार्म म्हणजे निम्म्या शहराला एकाच व्यक्तीकडून वीजपुरवठा करण्याची मोहीम आहे.

समतल जमिनीवर तयार करण्यात आलेल्या या सोलर फार्ममधून दरवर्षी 1.3 मेगावॉट वीजनिर्मिती होण्याची शक्‍यता आहे. एवढी वीज तयार करण्यासाठी तब्बल 3 हजार 600 टन कोळशाचे ज्वलन औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात केले जाते. काही वर्षांनंतर कार्टर यांच्या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील. या प्रकल्पामुळे या परिसरातून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या हरितगृहवायूंचे प्रमाण खूपच कमी होईल. अनेक व्यक्ती, समुदाय आणि अनेक देशांनीही जिमी कार्टर यांच्या सौरऊर्जा निर्मितीच्या चळवळीचे अनुकरण करून वेगाने वाटचाल सुरू केली आहे. “टेसला’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क यांनी या क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक केली असून, अशी काही उपकरणे तयार केली आहेत, ज्यांच्या वापरातून कमीत कमी खर्चात अधिकाधिक सौरऊर्जेची निर्मिती होऊ शकते. अर्थात अशी उदाहरणे हाताच्या बोटावर मोजण्याएतकी कमी आहेत; मात्र हीच मंडळी एका सोनेरी भविष्यासाठी मन लावून काम करीत आहेत.

पोर्तुगालमध्ये “तरंगती’ वीज 
जलाशयाच्या पृष्ठभागावर सौरऊर्जा निर्मितीसाठी पॅनेल बसविण्याचा यशस्वी प्रयोग पोर्तुगालमध्ये करण्यात आला आहे. हा जगातील पहिला हायब्रीड हायड्रोइलक्‍ट्रिक अँड सोलर पॉवर इन्स्टॉलेशन ठरला आहे. पोर्तुगालमधील अल्टो रोबागाओ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तरंगते सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत. या धरणावर जलविद्युत निर्मिती होतेच. परंतु आता दुहेरी वीज उत्पादन सुरू झाले आहे आणि दोन्ही प्रकारचे वीजउत्पादन स्वच्छ, निसर्गपूरक आहे. प्रकल्पातून प्रारंभी 220 किलोवॉट वीजनिर्मिती होत होती. सोलर पॅनेल बसविल्यामुळे आता 68 मेगावॉट वीजनिर्मिती येथे केली जाते. केवळ एकाच वर्षात हा प्रकल्प 332 मेगावॉट वीजनिर्मिती करू शकेल. शंभराहून अधिक घरे केवळ सौरऊर्जेमुळे उजळणार आहेत. “सीएल अँड टॅरी इंटरनॅशनल’च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उद्देश जलविद्युत ऊर्जेइतकीच वीज तयार करण्याचा आहे. धरणाच्या जलाशयात तरंगती सोलर पॅनेल उभी करणे केवळ फायद्याचेच नव्हे, तर सोलर पॅनेलद्वारे एरवीपेक्षा अधिक वीजनिर्मिती येथे होऊ शकते. दिवसभर सूर्याची ऊर्जा शोषून रात्री ही वीज परिसरात वितरित केली जाणार आहे. “सीएल अँड टॅरी इंटरनॅशनल’च्या अंदाजानुसार, जगभरातील प्रमुख मोठ्या धरणांच्या केवळ दहा टक्के भागावर तरंगती सोलर पॅनेल उभारली तर 400 गीगावॉट एवढी वीजनिर्मिती करणे शक्‍य आहे.

पोर्तुगालमधील हायब्रीड वीजप्रकल्पाची काही वैशिष्ट्ये आहेत. एक तर तो धरणाच्या विस्तीर्ण जलाशयावर तरंगती पॅनेल उभारून बनविलेला आहे. 840 सोलर पॅनेल येथे पाहायला मिळतात. पाण्यात पॅनेल उभारल्यामुळे महागड्या जमिनीचा वापर त्यासाठी करावा लागत नाही. ही जमीन अन्य कारणांसाठी वापरता येऊ शकते. “फ्लोटिंग फोटोवॉल्टिक पॅनेल’ची डिझाइन परिस्थितीला अनुकूल पद्धतीने करण्यात आले आहे. या पॅनेलचा पुनर्वापरही शक्‍य आहे. जलाशयात शेवाळे निर्माण होण्याचे प्रमाणही त्यामुळे कमी करता येईल. पॅनेलमुळे पाण्यातील लाटांची तीव्रता कमी होईल आणि किनाऱ्यावरील धूप रोखली जाईल. सौरऊर्जा आणि अन्य अपारंपरिक ऊर्जा ही काळाची गरज आहे. प्रदूषणाचे आणि पर्यावरणऱ्हासाचे परिणाम आणखी गडद होण्याची वाट पाहण्यात काहीच हशील नाही. जास्तीत जास्त लवकर सौरऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागतील. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात तर ते अधिक वेगाने करावे लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)