पर्यावरणमंत्र्यांचा आदेश बासनात गुंडाळला

इंद्रायणीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांना अभय

पुणे – प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई न केल्यामुळे पिंपरी महापालिकेसह लोणावळा, तळेगाव दाभाडे, देहू आदी सात नगरपालिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जुलै महिन्यातच दिले होते. मात्र, दोन महिने उलटून गेल्यानंतरही या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाण्याचे नमुने गोळा करण्याव्यतिरिक्‍त अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मंडळातर्फे पर्यावरणमंत्र्यांचेच आदेश धाब्यावर बसविले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरणमंत्री कदम यांनी जुलै महिन्यात इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत आणि एसटीपी प्लॅन्टबाबत आढावा घेतला होता. यावेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, आमदार सुरेश गोरे, प्रदूषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी एच. डी. गंधे आणि नगरपालिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सध्या अस्तित्वात असलेले प्रकल्प पुरेशा क्षमतेचे नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच तळेगाव आणि लोणावळा परिसरातील दूषित पाणी नदीत सोडले जात असल्याची माहिती कदम यांना देण्यात आली. यावर संताप व्यक्‍त करत कदम यांनी येथील अधिकारी आणि नगराध्यक्षांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ही जबाबदारी मंडळाचे प्रादेशिक अधिकारी हर्षप्रसाद गंधे यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यात पाण्याचे नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठविण्याव्यतिरिक्त इतर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही, अशी माहिती डॉ. गंधे यामुळे मंडळाकडूनच पर्यावरण मंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आधीच वाढत्या पर्यावरणीय समस्यांनी त्रासलेल्या नागरिकांना अशा ढिसाळ कारभारामुळे अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. जिथे मंत्र्यांचेच आदेश डावलले जातात, तिथे सर्वसामान्य नागरिकांचे कोण ऐकणार? अशा प्रतिक्रिया पर्यावरण कार्यकर्त्यांकडून व्यक्‍त केल्या जात आहेत.

पर्यावरणाबाबत खरेच गांभीर्य आहे का?
शहरातील पर्यावरणाच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणेकरांच्या आरोग्यावर घातक परिणाम करणाऱ्या वायू प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या पाच महिन्यात (150 दिवस) केवळ 14 दिवस पुण्यातील हवा “शुद्ध’ होती, अशी माहिती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या “रिअल टाइम मॉनिटरिंग सिस्टम’च्या माध्यमातून समोर आली आहे. यामध्ये पीएम 10 या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचेही दिसून येते. तर जानेवारी 2017 ते जून 2018 या कालावधीत बंडगार्डन आणि विठ्ठलवाडी येथे नदीचे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे मंडळाच्याच नोंदीतून समोर आले आहे. याव्यतिरिक्‍त शहरात कचरा, ध्वनी प्रदूषण यांचीही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मात्र, ही स्थिती सुधारण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)