- वाहन चालकांचे प्रबोधन : लोणावळ्यात रस्ता सुरक्षा अभियानाचा “श्रीगणेशा’
लोणावळा – पुणे ग्रामीण पोलीस दल आज दि. 23 एप्रिल ते 5 मे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहे. पर्यटन नगरी लोणावळात आज अभियानाचे उद्घाटन झाले. जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील लोणावळा शहर पोलिसांच्या वाहतूक शाखा चौकीवर वाहन चालकांच्या बैठकीत लोणावळा शहर पोलिसांनी सर्वांना रस्ता सुरक्षेचे धडे दिले. बैठकीला शहरातील ऑटो रिक्षा चालक-मालक, टेम्पो, ट्रक चालक-मालक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले व नागरीक आणि वाहन चालकांच्या अडचणी जाणून घेतल्या. राज्य शासनाच्या अभियानाचा पुणे-मुंबई महामार्ग आणि लोणावळा शहरातून प्रबोधन झेंडा हाती घेण्यात आला.
नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातात दरवर्षी सुमारे 12 हजार प्रवाशांचा बळी जातो. त्यामुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. याचा विचार करून राज्यात रस्ता सुरक्षा अभियानातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांत पोहचवण्याचे काम केले जात आहे.
सहाय्यक पोलीस अधिकारी अरविंद काटे म्हणाले, अती वेग व नियमांकडे दुर्लक्ष करून वाहे चालवण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 80 टक्के अपघातांना मानवी चुका जबाबदार असल्याने वाहन चालवताना ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी, तसेच स्वयंशिस्त पाळावी. मद्य प्राशन करू नये. पोलीस हवालदार पंढरीनाथ कामठे, लोणावळा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, पोलीस नाईक प्रकाश सामील, ट्रॅफिक वॉर्डन दर्शन गुरव, मारुती आंबेकर यावेळी उपस्थित होते.
अशी असेल जनजागृतीची मोहीम
रस्ता सुरक्षा अभियानावेळी रॅली काढून जनजागृती व अपघात रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती करून देणे, तसेच प्रबोधन करणे, रस्ता सुरक्षा विषयावर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. माहिती पुस्तिका आणि पत्रके वाटणे, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे, प्रशिक्षण शिबीर, आरोग्य तपासणी करणे, हेल्मेट सक्ती, सीट बेल्ट, लेन कटिंग, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, टेल लॅम्प, दारू पिऊन वाहन चालवणे याबाबत जनजागृती आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा