पर्यटन तालुक्‍यात होतेय झाडांची कत्तल

ओतूर-पर्यटन तालुक्‍यात जुन्नर – ओतूर रस्त्याचे तसेच लेण्याद्री ते ओझर रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून प्रवाशांच्या व नागरिकांच्या दृष्टीने ही बाब निश्‍चित महत्वपूर्ण आहे; परंतु हा रस्ता होत असताना पर्यटन तालुक्‍यात शेकडो वर्षापुर्वींच्या कित्तेक वटवृक्षांची कत्तल झाल्याने पर्यावरण प्रेमी व नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात असून ह्याचे दुष्परिणाम भविष्यात पाहावयास मिळणार असल्याची चर्चा होत आहे.

रस्त्याच्या दुतर्फा असणारे हे वटवृक्ष शेकडो वर्षांपासून वाटसरूला शीतल छाया देण्याचे व पर्यावरण संवर्धनाचे अविरत कार्य करीत आहेत. ह्या झाडांमुळे पर्यावरण समतोल राखला जातो. एकीकडे कोटी वृक्ष लागवडीचा नारा तर दुसरीकडे झाडांची कत्तल असा विरोधाभास जुन्नरमध्ये पाहावयास मिळत आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये जमीनदोस्त करण्यात आलेल्या झाडांमधील काही झाडे नक्कीच वाचवता आली असती. पर्यायाने वसुंधरेला प्रदूषणापासून वाचवण्याचा देखील प्रयत्न करता आला असता; परंतु तसे काही पाहावयास मिळाले नाही, हीच शोकांतिका. रस्त्याच्या बाजूला काही वर्षांपासून सातत्याने वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत कित्तेक झाडांची लागवड झाली; परंतु त्यातील किती जगलीत, हा मात्र संशोधानाचा विषय आहे. असे असताना देखील शेकडो वर्षापूर्वींच्या झाडांना तिलांजली देण्याचे काम जुन्नर तालुक्‍यात होत आहे. हा चिंतेचा विषय आहे. आगामी काळात तरी रस्ते रुंदीकरण करताना झाडांची कत्तल होणार नाही, याकडे संबधित विभाग काळजीपूर्वक लक्ष देईल आणि तशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेकडो झाडांची नव्याने लागवड कागदोपत्री नाही तर प्रत्यक्षात करून त्यांची जोपासना करतील हीच निसर्गप्रेमी, पर्यावरण प्रेमींची व नागरिकांची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.