परिंचेत स्नेहसंमेलन उत्साहात

परिंचे- येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाविष्काराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बक्षीस रुपाने सोळा हजार रुपये ग्रामस्थांकडून शाळेला देण्यात आले. स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन प्रा. पांडुरंग जाधव व संभाजी नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीप्ती अडसूळ, बाळासाहेब फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान बोलताना शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण पोमण म्हणाले की, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम राबवले जात असून मुलांना संगणकीय शिक्षण व ई-लर्निंग सुविधा शाळेच्या माध्यमातून पुरविण्यात आली आहे. मराठी माध्यमांच्या शाळांमधून डिजिटल शिक्षणाबरोबरच आपली संस्कृती व परंपरा जपण्यासाठी लहानपणापासून मुलांवर संस्कार केले जात असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करून कार्यक्रमाला सुरवात केली.

कार्यक्रमांमध्ये मराठी-हिंदी गाण्यांबरोबरच ऐतिहासिक पोवाडे, आदिवासी नृत्य, मनोरे, नाटिका व मुकाभिनय सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. आईचा जोगवा, खंडेराया झाली माझी दैना, आई मला खेळायला जायचे, शिवबा आमचा मल्हारी आदी गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका राणी पोमण व महेश जाधव यांनी केले तर मुख्याध्यापक प्रविण पोमण यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.