पराभवानंतरही भाजपचा बारामतीतील दुष्काळग्रस्तांच्या मदतीला

2 हजार लिटर क्षमतेच्या 200 पाण्याच्या टाक्‍या गावांना सुपूर्द : जिरायती भागात चार टॅंकर सुरू

जळोची – लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या जिरायती भागाने राष्ट्रवादीला भरभरून मते दिली असतानाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून दुष्काळी भागातील जनतेसाठी 2 हजार लिटर क्षमतेच्या 200 पाण्याच्या टाक्‍या देण्यात आल्या. याशिवाय जिरायती भागातील गावांसाठी चार पाण्याचे टॅंकरही सुरू करण्यात आले आहेत. पाटील यांच्या या मदतीमुळे त्यांनी अद्यापही बारामतीवरील लक्ष कमी केले नसल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणूकीत पाटील यांनी बारामतीचा जिरायती भाग पिंजून काढला. येथील दुष्काळी स्थितीला पवार जबाबदार असल्याचे सांगत परिवर्तनाची हाक दिली. तालुक्‍यातील जनतेने पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद न देता राष्ट्रवादीलाच मते दिली. त्यामुळे बॅकफूटवर गेलेला भाजप शांत बसेल अशी चिन्हे होती; परंतु लोकसभा निकाल जाहीर झाल्यानंतरही पाटील यांनी या भागासाठी 2 हजार लिटर क्षमतेच्या 200 पाण्याच्या टाक्‍या मोफत दिल्या आहेत. याशिवाय जिरायती भागातील गावांसाठी 4 पाण्याचे टॅंकरही सुरू करण्यात आले आहेत. जिरायती भागामध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून जलयुक्‍त शिवार योजनेची भरपूर कामे झाली आहेत. वॉटर कप स्पर्धेच्या निमित्तानेही जलसंधारणाची कामे झालेली आहेत; परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत समाधानकारक पाऊसच झालेला नाही. त्यामुळे जनतेचा पाण्यासाठी आक्रोश कायम आहे.

तीव्रटंचाईच्या काळात विविध सामाजिक संघटनाही आपापल्या परिने मदत करत आहेत. पाटील यांच्या सहकार्यातून झालेल्या मदतीमुळे दुष्काळी जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. एकीकडे आपला तालुका सोडून बारामतीकरांकडून अन्य तालुक्‍यात दुष्काळी मदत, दौरे केले जात आहेत, आम्ही मात्र, दुष्काळी जनतेला दिलासा मिळावा यासाठी मदतीला कायम तत्पर असल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले.

  • लोकसभा निवडणूक काळामध्ये जिरायती भागातील जनतेने केलेल्या मागणीनुसार चंद्रकांत पाटील यांनी बारामती तालुक्‍यासाठी ही मदत केली. येथील ज्येष्ठ नेते शरद पवार राज्यभर दुष्काळी दौरे करत आहेत; परंतु बारामती तालुक्‍यात मात्र ते फिरत नाहीत. येथील बहुतांश संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना संस्थांच्या माध्यमातून चारा डेपो, छावण्या, पाण्याचे टॅंकर सुरु केल्या जात नाहीत. परंतु भाजपाने मात्र राजकारण न करता हे काम सुरू केले आहे.
    – दिलीप खैर, संचालक, महानंद
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×