परकीय गुंतवणुकीच्या विरोधात कॅटचा बंद : शहरातील 82 व्यापारी संघटना संपात सहभागी

पुणे- किरकोळ क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस 100 टक्‍के पाठिंबा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, दिल्ली (कॅट) ने पुकारलेल्या भारत बंदला पुणे व्यापारी महासंघ आणि त्यांच्याशी संलग्न 82 व्यापारी संस्थांनी बंदला पाठिंबा दर्शविला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून बंदला चांगला पाठिंबा मिळाला असल्याची माहिती कॅटचे पश्‍चिम विभागीय समन्वयक अजित सेटीया यांनी दिली आहे. दुपारी साडेबारा वाजता सर्व संस्था मिळून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
मॉलमुळे किरकोळ व्यापारी आधीच त्रस्त आहेत. आता तर परकीय कंपन्यांना रिटेलमध्ये 100 टक्‍के गुंतवणुकीस करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. याविरोधात यास पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी (दि.28) रिटेल व्यापारी दुचाकी रॅली काढून निषेध नोंदविणार आहेत. भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दि पुना मर्चंट्‌स चेंबरने बंदला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. सारसबागेतील गणपतीची आरती करून सकाळी 11 वाजता ही रिटेल व्यापाऱ्यांची दुचाकी रॅली बाजीराव रस्त्याने जुना बाजारमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे. त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली. तर भुसार बाजारातील व्यापारी बंद पाळणार असल्याचे दि पुना मर्चंट्‌स चेंबरने यापूर्वीच जाहीर केले आहे. केंद्र सरकार 7 कोटी लोकांना रोजगार देण्यासाठी 35 कोटी लोकांच्या रोजगारावर पाय देऊन रिटेल व्यवसायात 100 टक्‍के परदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाची अंमलबजावणी करीत आहे. इतका साधा आणि सरळ विचार केंद्र सरकारच्या लक्षात येत नाही, हेच विशेष आहे. आजच्या घडीला अमेरिकेने कायदा करून देशांतील व्यापाराला संरक्षण दिले आहे. चीन, रशिया सर्वजण स्थानिकांना प्रथम प्राधान्य देत असताना आपले सरकार मात्र स्थानिक रिटेल व्यवसाय संपविण्याचे काम करीत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बेरोजगारी वाढेल, असे सचिन निवंगुणे यांनी म्हटले आहे. दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनीही या बंदला पाठींबा दिला आहे. याशिवाय हमाल पंचायत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, पुणे व्यापारी मंडळ, ऑल इंडिया चेमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, पुणे स्टेशनरी अँड कटलरी असोसिएशन, पुणे होलसेल जनरल मर्चंट्‌स अशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)