पबजी गेमच्या विळख्यात तरुणाई

अभ्यासाकडे दुर्लक्ष करून युवक तासन्‌तास ‘गेम’ मध्ये व्यस्त
प्रसाद शेटे

मेढा – मोबाईल आजच्या युगात वरदान ठरत असला तरी त्यातील हिंसक गेम्स मानवजातीला लागलेले ग्रहण आहे. मोबाईल गेम्स तरुणाईला वास्तवापासून दूर नेत आभासी दुनियेच्या दरीत कडेलोट करीत आहेत. ज्या वयात मुलांचा शारीरिक, बौद्धिक व भावनात्मक विकास सर्वात जास्त होतो, त्या वयात गेम्समुळे त्यांची भावनात्मक व बौद्धिक वाढ खुंटली जाते.

ऑनलाईन मोबाईल गेम्स खेळताना जास्तीत जास्त रेडिएशन उत्सर्जित होत असतात. त्यातूनच लहान मुलांमध्ये व तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललं आहे. गेम्समुळे दृष्टीवर परिणाम होतो व दृष्टीचे अधुपण मुलांच्या वाट्याला येतं आहेत. गेम्सचे व्यसन पराकोटीला गेलेल्या मुलांमध्ये गेम न मिळाल्यास अस्वस्थ वाटणे, दृष्टीचे अधूपण, मायग्रेन, शारीरिक स्थूलता अशी लक्षणं दिसून येतात. पबजी सारख्या गेम्समुळे मुलं नकळत हिंसक होत चालली आहेत. जगभरात धुमाकूळ घातलेल्या “पब जी गेमच्या विळख्यात जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह युवक अडकले असून, या गेमममुळे युवकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

चार ते पाच महिन्यांपूर्वी “पबजी’ हा गेम स्मार्टफोनच्या दुनियेत दाखल झाला. दक्षिण कोरियामधील
ब्ल्युव्हेल या कंपनीने पबजी गेमची निर्मिती केली आहे. यापूर्वी संगणक गेम्सच्या विश्‍वात काऊंटर स्ट्राईक तसेच फ्रीफायर या गेमने वेड लावले होते. त्याच सारखी साधर्म्य असलेली वैशिष्ट्‌ये पबजी गेममध्ये असल्याने युवक व लहान मुलामध्ये त्यांची क्रेझ वाढली आहे. मेढा शहरातील चौकाचौकात, एसटी डेपो, वेण्णा कॉलेज परिसरात हा गेम युवक तासन्‌तास खेळत आहेत. अभ्यास व काम बाजूला ठेवून मुलं यात गुंतत असल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे. या गेमपासून मुलांना दूर ठेवणे आवश्‍यक आहे. त्याच बरोबर पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.