पत्नीच्या हौसेपोटी बनला ”बुल्लेट राजा”

सासुरवाडीतून मुक्काम थेट पोलीस ठाण्यात

कोल्हापूर – पत्नीच्या हौसेसाठी आणि सासरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी एका प्रेमवेड्याने चक्क बुलेट चोरल्याची घटना शहरात घडली. या चोरीच्या बुलेटवरुन पत्नीला घेऊन सवारी करीत असतानाच पोलिसांनी त्याला सासुरवाडीतून अटक केली. जयदीप शहाजी पाटील असे या संशयिताचे नाव आहे. जयदीप हा उच्च शिक्षीत असून त्याचे वडील माजी सैनिक आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जयदीप (वय २२, रा. सुयोग कॉलनी, कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. कळंबा, कोल्हापूर) याचा काही दिवसापूर्वी कराड येथील मोरेवाडीतील एका तरुणीशी प्रेमविवाह झाला आहे. अधिकमास महिना असल्याने जयदीप पत्नीला घेऊन सासुरवाडीला जाणार होता. पत्नीला बुलेट आवडत असल्याने आणि त्यातच सासरकडच्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी त्याने बुलेट घेऊनच तिकडे जाण्याचा बेत आखला. त्यासाठी त्याने त्याच्या मित्रांकडे बुलेट मागितली. मात्र त्याला ती मिळाली नाही. अनेक प्रयत्न करूनही बुलेट मिळत नसल्याने हताश झालेल्या जयदीप याने बुलेट कुठून तरी चोरण्याची योजना आखली.

शहरातील कावळा नाका परिसरात असणाऱ्या बुलेटच्या वर्कशॉपमध्ये बुलेट सर्व्हिसिंगला येत असल्याची माहिती जयदीपला होती. दरम्यान २६ मे रोजी कागल येथील पंडित बापू सुतार, हे कावळा नाका येथील वर्कशॉपमध्ये बुलेट सर्व्हिसिंगला घेऊन आले होते. यावेळी जयदीप याने आपण वर्कशॉपमधील कर्मचारी असल्याचे भासवून पंडित सुतार यांना गाडीची ट्रायल घेणार असल्याचे सांगितले. सुतार यांनी जयदीप याला बुलेटची चावी देताच जयदीप याने त्याठिकाणाहून धूम ठोकली. जयदीप तेथून कळंबा येथील घरी आला. याठिकाणी त्याने नंबरप्लेट बदलून पत्नीला नवीन बुलेट खरेदी केल्याचे सांगितले. त्याच दिवशी पत्नीला घेऊन मोरेवाडी येथील सासूरवाडीस गेला. सासू-सासऱ्यांना लग्न केल्यानंतर जावयाची प्रगती झाली, असे वाटावे यासाठी नवीन बुलेट खरेदी केल्याचे त्याने सांगितले. बुलेट घेऊनच त्याची सासूरवाडीत स्वारी सुरू होती. याचवेळी पोलिसांनी त्याला मोरेवाडी येथून अटक केली. या घटनेमुळे सासूरवाडीतील लोकांना आणि त्याच्या पत्नीला मोठा धक्का बसला. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जयदीप पाटील याने आपण चोर नसून, पत्नीच्या हौसेखातीर आणि सासूरवाडीतील लोकांना इम्प्रेस करण्यासाठीच बुलेट चोरल्याची कबुली दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)