…पण कुत्रा आवर!

संग्रहित छायाचित्र

रेबीजमुळे आणखी एक मृत्यू: मृतांचा आकडा 8 वर

पुणे – “भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी प्रचलित म्हण सध्या तंतोतत्र लागू पडत आहेत. कुत्र्याने चावा घेणाऱ्यांची संख्या सात हजारांहून अधिक झाली आहे. तर जानेवारीपासून आतापर्यंत 8 जणांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळेच आता या कुत्र्यांना वेळीच आवर घातला नाही, तर स्वाइन फ्लू आणि डेंग्यूपेक्षाही जास्त मृत्यू यामुळे होतील, अशी भीती व्यक्‍त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुत्रा किंवा अन्य प्राण्यांनी चावा घेतल्याने रेबीज हा विषाणूजन्य रोग होतो. त्याची बाधा झालेल्या प्राण्यांच्या चाव्यातून विषाणू लाळेद्वारे जखमेत शिरतात. ते अतिसूक्ष्म व बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे असतात आणि तेथून मज्जातंतूवाटे मेंदूत प्रवेश करतात व तेथे त्यांची वाढ होते. तथापी 90 टक्के रेबीज कुत्र्यांपासून होतो. तसेच बाधित मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर, उंट, घोडा या पाळीव प्राण्यांबरोबरच कोल्हा, लांडगा, तरस, मुंगूस या जंगली प्राण्यांपासूनही होऊ शकतो.

सध्या जानेवारीपासून आकडेवारी पाहिली असता 7 हजारांहून अधिक जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. तर शहरात 8 जणांचा मृत्यू हा रेबीज हा रोग झाल्याने झाला आहे. जानेवारीत 821, फेब्रुवारी-1 हजार 244, मार्च-929, एप्रिल 856, मे-791, जून 943 व जुलै-1,355 जणांचा चावा शहरातील कुत्र्यांनी घेतला आहे. ऑगस्टची आकडेवारी अजून पालिकेने जाहीर केलेली नाही. तर मृतांमध्ये मार्च व एप्रिलमधील प्रत्येकी 1, जून-2 व जुलै- 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ऑगस्टमधील पहिली केस आता समोर आली आहे.

प्रतिबंधक लस हाच उपाय
रेबीजबाधित कुत्रा चावल्यानंतर लस न घेतल्यास 2 आठवडे ते सहा महिन्यांत या रोगाची लक्षणे दिसून येतात. परंतु चावा मेंदूपासून किती अंतरावर घेतलेला आहे, त्यावर त्याचे लक्षणे दिसून येण्याचा कालावधी अवलंबून असतो. पण चेहरा, मान, खांदा येथे चावा घेतल्यास एकाच आठवड्यात त्याची लक्षणे दिसून येऊ शकतात. तर हात, बोटे, पाय येथे असेल तर लक्षणे उशिरा दिसून येतात. बाधित प्राण्यांनी चावा घेतल्यास यामध्ये केवळ रेबीज प्रतिबंधक लस घेणे हाच एकमात्र उपाय असून लस न घेतल्यास मात्र 100 टक्के मृत्यू होतो. कारण त्यावर कोणतेही औषध सध्या उपलब्ध नसल्याचे डॉक्‍टर सांगतात.

रेबीज झालेला तरुण हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तो तिकडे असतानाच त्याला कुत्रा चावला. तो कामासाठी लोणावळ्यात असल्याने पुण्यात उपचार घेत होता. पुणे शहरातील केसेसशी याचा संबंध नाही.
– डॉ. सुधीर पाटसुते, प्रभारी अधीक्षक, नायडू हॉस्पिटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)