पठारवाडीत सहा झोपड्यांना आग

जीवनावश्‍यक वस्तू भस्मसात

चाकण-येथून जवळच असणाऱ्या पठारवाडीतील (ता. खेड) कातकरी वस्तीमध्ये पाच ते सहा झोपड्यांना आग लागून त्यामध्ये झोपड्या व त्यातील जीवनावश्‍यक साहित्य जळून खाक झाल्याची घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चाकणजवळील स्वप्ननगरीच्या मागील बाजूस पठारावाडी रस्त्यावर असणाऱ्या कातकरी वस्तीमधील एका झोपडीमध्ये स्वयंपाकासाठी पेटवलेला चुलीतला निखारा तसाच राहिल्याने वाऱ्यामुळे त्यातील ठिणगी कपड्यावर पडली. यामध्ये एका झोपडीला आग लागली. हा हा म्हणता या आगीने शेजारील पाच झोपड्यांना आपल्या कवेत घेऊन त्यातील सर्व जीवनावश्‍यक साहित्य भस्मसात केले. यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांनी पाण्याचा, मातीचा वापर करून आग आटोक्‍यात आणली.

आगीचे रौद्र रूप लक्षात घेऊन इतरत्र आग पसरु नये, यासाठी चाकण औद्योगिक वसाहत व राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी बोलविण्यात आले. मदत मिळेपर्यंत आगीने आपले काम चोख बजावले होते. जीवनावश्‍यक वस्तूंसह सहा झोपड्यातील संसार जळून खाक झाले. स्थानिक कार्यकर्त्यांनी आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न केले. चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन नगर परिषदेकडे अग्निशमन यंत्रणा असण्याची गरज आहे. कातकरी वस्तीतील आपदग्रस्तांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश आगरकर यांनी केली. दरम्यान, जळीतग्रस्तांचे पंचनामे करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.