पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्‍टला जपानचा झटका

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला ब्रेक


जपानने रोखला निधी : शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यास सांगितले

 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाला आणखी एक झटका बसला आहे. या प्रकल्पाला अर्थसहाय्य करणारी जपानी कंपनी जपान इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीने (जायका) प्रकल्पासाठीचा निधी रोखला आहे. पालघरच्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जपानी कंपनीने मोदी सरकारला शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यास सांगितले आहे. यामुळे हा प्रकल्प आणखी काही काळ लांबणार असण्याची शक्‍यता आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा आहे. यासाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण सुरु आहे. मात्र शेतकरी त्याला विरोध करत आहेत. या वादानंतर केंद्र सरकारने एका विशेष समितीची स्थापना केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांनी जमिनी देताना विरोध करताना गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच जायकालाही कळवले की हा प्रकल्प राबवताना सरकारने सामाजिक तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतलेली नाही. जोपर्यंत मार्गदर्शक तत्वांची अमलबजावणी होत नाही तोपर्यंत सरकारला या प्रकल्पासाठी निधी देऊ नये, अशी विनंती शेतकऱ्यांनी जायकाकडे केली. याची दखल घेत जायकाने निधी थांबवल्याचे समजते.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी अपेक्षीत 1 लाख कोटी रुपयांपैकी जपान 88 हजार कोटीचे कर्ज देणार आहे. हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर बुलेट ट्रेन हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. जायका ही जपान सरकारची एजन्सी आहे. ही कंपनी जपान सरकारसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक-आर्थिक धोरणांसाठी काम करते. तर भारताकडून नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला (एनएचआरसीएल) भारतात बुलेट ट्रेनची जबाबदारी दिली आहे.

केवळ 125 कोटींचा कर्जपुरवठा
मुंबई-अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून आहे. या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्टेशन्स असतील. मात्र त्यासाठी हजारो हेक्‍टर जमिनीचं अधिग्रहण करावे लागणार आहे.

आतापर्यंत जपानच्या कंपनीने केवळ 125 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा केला आहे. भारत आणि जपानमध्ये झालेल्या करारानुसार बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. मात्र आता या प्रकल्पाला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)