पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यासाठी चीनमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

बीजिंग (चीन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यासाठी चीनमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी दि, 27 एप्रिल रोजी चीनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनचा मध्य प्रांत हुबेईची राजधानी वुहान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या दोन नेत्यांची भेट होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या वुहान येथील वास्तव्यादरम्यान त्यांचा निवास असलेल्या हॉटेलसमोरील घरे आणि अन्य इमारतींच्या खिडक्‍या पुढील दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत चीन सरकार कोणत्याही प्रकारची कुचराई चालवून घेणार नाही.

वुहान येथे होणाऱ्या आपल्या बैठकीत दोन्ही देशांचे प्रमुख नेते सीमाविवाद मिटवण्याचा प्रयत्न करणार आहेत. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या 3448 किमी लांबीच्या सीमेबाबत दोन देशांत दीर्घकाळ विवाद चालू आहे. चीनच्या वन बेल्ट वन रोड बाबत भारताला अनेक शंका आहेत. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाबाबत कारवाईत चीनकडून येत असलेले अडथळे, दोन देशातील व्यापार आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात होणाऱ्या चर्चेबाबत कोणत्याही प्रकारचे लिखित विवरण देण्यात आलेले नाही. संयुक्त पत्रकार परिषद आणि घोषणापत्रही जाहीर करण्यात आलेले नाही. यावरून ही बैठक अतिशय अनौपचारिक आणि वैयक्तिक पातळीवर होणार असल्याचे दिसून येत आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास वुहान शहरात आमंत्रित करण्यात आलेले आहे. वुहान हे चीनचे एक अतिशय महत्त्वाचे शहर असून त्यातून यांगत्से नदी वाहते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)