पंतप्रधान आवास योजनेभोवतीचे धुके दाट

आरोप-प्रत्यारोप सुरुच: केंद्राच्या निकषानुसार निविदा नसल्याची तक्रार

पिंपरी  – महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडी येथे उभारल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. अशा परिस्थितीत पिंपरी व आकुर्डी येथील गृहप्रकल्पांची नव्याने प्रसिद्ध केलेल्या निविदेने या संशयाचे धुके आणखी दाट केले आहे. या सर्व गृहप्रकल्पांची निविदा प्रक्रिया केंद्राच्या निकषानुसार प्रसिद्ध कराव्यात, अशी मागणी स्थायी सदस्य राजू मिसाळ व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बोऱ्हाडेवाडीतील गृहप्रकल्पाला 2900 रुपये दराच्या निविदेला मंजुरी दिल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. या दराचा प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पाशी तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर साडे अकरा कोटींची बदत झाली आहे. मात्र. या प्रकल्पाला नव्याने केंद्र व राज्य सरकारची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्पाचा विषय स्थायी सदस्य विकास डोळस यांनी स्थायी सभेत उपस्थित केला. दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रावेतमधील प्रस्तावित प्रकल्प पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीसाठी रखडला आहे. तर आकुर्डीच्या गृहप्रकल्पाची फेरनिविदा काढण्यात आली आहे. आकुर्डीच्या गृहप्रकल्पाची फेरनिविदा कोणत्या निकषांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे, असा प्रश्‍न स्थायी सदस्य राजू मिसाळ यांनी उपस्थित केला. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. मात्र, सहशहर अभियंता राजन पाटील या बैठकीला उपस्थित नसल्याने या विभागाच्या अधिकाऱ्याने याबाबत असमर्थता दर्शविली. त्यामुळे स्थायी सदस्य चांगलेच भडकले.

याबाबत राजू मिसाळ म्हणाले की, केंद्र सरकारने ठरविलेल्या निकषांनुसार पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रसिद्ध करणे आवश्‍यक आहे. मात्र, या सर्वच गृहप्रकल्पांच्या निविदांमध्ये हे निकष पाळले जात नाहीत. त्यामुळे दरांमधील तफावत आढळते. यावरून वाद निर्माण झाल्याने पुन्हा दराची तपासणी व अन्य बाबींमुळे हे प्रकल्प उभारणीपुर्वीच वादग्रस्त ठरत आहेत. त्यामुले या सर्व गृहप्रकल्पांची निविदा प्रक्रिया केंद्र सरकारच्या निकषांनुसार राबविण्यात यावी.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकांसाठी पिंपरी व आकुर्डीत उभारल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा प्रकल्पाला माझा विरोध नाही. या दोन्ही ठिकाणच्या गृहप्रकल्पांसाठी निविदेतील दर चढाच आहे. त्यामुळे या गृहप्रकल्पांच्या दरालादेखील भविष्यात विरोध होऊन, त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
                                        – मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)