पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील – मुख्यमंत्री

मुंबई – नक्षलवादी संघटनांशी संबध असल्यावरून पाच जणांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास नकार देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणारे, समाजा-समाजात विद्वेष पसरवून देशात वाईट वातावरण निर्माण करणारे, देशविरोधात षडयंत्र रचणारे निश्‍चित गजाआड जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला.

फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या कारवाईवर शिक्‍कामोर्तब केले आहे. पुणे पोलिसांनी दिलेले पुरावेही सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविले आहेत. त्यांच्याविरोधात हे राजकीय षडयंत्र नव्हते. विरोधकांचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न नव्हता. पोलिसांनी केलेली ही कारवाई होती. देशाविरोधातील हे षडयंत्र अनेक वर्षे चालू होते. माओ नक्षलवादी व त्यांना साथ देणारे शहरी नक्षलवादी यांचे संबंध स्पष्ट करणारे पुरावे आहेत. बंदी घातलेल्या संघटनांशीही त्यांचे संबंध होते, हे यातून स्पष्ट झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. देशाविरोधातील षडयंत्र जेव्हा समोर येते तेव्हा आपापली राजकीय भूमिका बाजूला ठेवून देशाने एकत्रितरित्या उभे राहिले पाहिजे. ही राजकीय हेतूने प्रेरित कारवाई नव्हती. कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारे देशविरोधातील षडयंत्र रचणाऱ्यांना साथ देणार नाही. जे साथ देतील त्यांचा बुरखा आपोआप फाटेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)