पंजाबमधील मित्रपक्षांची हरियाणात जुंपली

भाजप आणि अकाली दलामध्ये शाब्दिक चकमकी
चंडीगढ : भाजप आणि शिरोमणी अकाली दल या पंजाबमधील मित्रपक्षांमध्ये हरियाणात जुंपली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणाऱ्या त्या पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी झडत आहेत.

शिरोमणी अकाली दल हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक आहे. मात्र, हरियाणातील निवडणुकीवरून त्यांचे संबंध ताणले गेल्याचे तूर्त तरी दिसत आहे. प्रामुख्याने अकाली दलाकडून भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. हरियाणात एकत्रितपणे लढण्याचे आश्‍वासन भाजपने पाळले नाही, अशी टीका त्या पक्षाकडून आधी करण्यात आली होती. त्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख सुखबिरसिंग बादल यांनी एकप्रकारे भाजपला हरियाणातील सत्तेवरून पायउतार व्हावे लागेल, अशा आशयाचे भाकित केले.

हरियाणातील स्थिती वेगाने बदलत आहे. सरकार स्थापण्याचे स्वप्न पाहत असलेल्यांना विरोधात बसावे लागेल, असे ते रविवारी एका सभेत बोलताना म्हणाले. त्यावर भाजपकडून उपहासात्मक प्रतिक्रिया देण्यात आली. हरियाणाची सत्ता भाजप राखणार आहे. अकाली दल आमचा पंजाबमधील मित्रपक्ष असल्याने बादल यांना आम्ही विशेष पाहुणे म्हणून शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करू, असे भाजपचे नेते तरूण चुघ यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.