…तर पंकजांना तासाभरासाठी मुख्यमंत्री करा

शिवसेनेची उपरोधिक सूचना
मुंबई – आपण मुख्यमंत्री असतो तर तासभरात मराठा आरक्षणाच्या फाईलवर आपण स्वाक्षरी केली असती असे विधान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अलिकडेच केले होते, त्या पार्श्‍वभूमीवर पंकजांना तासाभरासाठी मुख्यमंत्री करा अशी उपरोधिक सुचना शिवसेनेने केली आहे. पंकजा मुंडे यांनी नुकतेच बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले होते. त्या संबंधात शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात ही सूचना करण्यात आली आहे.

पंकजांचे विधान गांभीर्याने घेतले तर मराठा आरक्षणाविषयी सरकार मुद्दाम टाळाटाळ करीत आहे असा आरोप त्या करीत असाव्यात असे दिसते असेही यात नमूद करण्यात आले आहे. पंकजा मुंडे एका तासात कोणत्याही अडचणीशिवाय मराठा आरक्षणाचा विषय मंजुर करणार असतील तर त्यांना सर्व संमतीने किमान एक तासासाठी तरी मुख्यमंत्री केले पाहिजे.
फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना या विषयात हस्तक्षेप करण्याची सुचना केली पाहिजे पण ते का जात नाहीत असा सवालही शिवसेनेने केला आहे. पण जरी मुख्यमंत्री दिल्लीत गेले तरी नेहमीप्रमाणे पंतप्रधान दिल्लीत नाहीत. ते देशाला वाऱ्यावर सोडून विदेशात गेले आहेत असा टोमणाही शिवसेनेने मारला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षण आंदोलन चिरडून टाकणे हे सरकारचे धोरण दिसते आहे अशी टिकाही शिवसेनेने केली आहे. भाजपने गुजरात मधील पटेलांचे आरक्षण आंदोलन असेच चिरडून टाकले. या आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेऊन त्यांना तुरूंगात घातले. तसेच आता ते महाराष्ट्राच्या बाबतीत करीत आहेत. हे आंदोलन चिघळल्याबद्दल एकट्या फडणवीसांना दोष देता येणार नाहीं. कारण भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी निवडणुकीपुर्वी जी अवास्तव आश्‍वासने दिली त्याचीच ही परिणीती आहे.

धनगर आणि मराठा समाजाला आरक्षणाचे गाजर निवडणुकीपुर्वी दाखवले गेले आहे आता त्याची पुर्तता झाली पाहिजे. त्यासाठी त्या आरक्षण विषयाच्या फायली पंकजा मुंडेंकडे पाठवून द्या अशी उपरोधिक सूचनाही शिवसेनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)