न्हावरेत विजेचाही दुष्काळ

न्हावरे – न्हावरे (ता. शिरुर) गावावर नैसर्गिक दुष्काळाबरोबरच वीज वितरण कंपनीकडून विजेचा दुष्काळ लादला जात आहे.

न्हावरे येथील मुख्य गावठाणातील दोन विद्युत रोहित्र व परिसरातील कोकडेवाडी येथील एक विद्युत रोहित्र निकामी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याबरोबरच विजेच्याही दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. सुमारे पाच ते सहा दिवसांपासून न्हावरे गावठाण व कोकडेवाडी परिसरात विजेचा दुष्काळ आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बोअरवेल्स, पिठाच्या गिरणी तसेच विजेवर अवलंबून असलेली इतर उपकरणे बंद असून, सर्व सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने बिघडलेली विद्युत रोहित्रे दुरुस्त करुन नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी होत आहे. अन्यथा न्हावरे ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. खासगी पाण्याचे बोअरवेल बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे तसेच पिठाच्या गिरणी बंद असल्याने दळण दळून आणण्यासाठी नागरिकांना शेजारील गावांतून पाच ते दहा किलोमीटर प्रवास करून दळून आणावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.