न्हावरेत गारांचा पाऊस, अणेत हलक्‍या सरी

मान्सूनपूर्वमुळे जमिनीचा गंध सर्वत्र दरवळला : बळीराजाला दमदार पावसाची आस

अणे – अणे, आनंदवाडी, पेमदरा, गुळुंचवाडी, बेल्हे, बांगरवाडी या परिसरात रविवारी (दि. 2) दुपारी चारच्या सुमारास पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्या त्यामुळे यंदा लवकरच मान्सून पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

रविवारी सकाळपासूनच कडक उन होते त्याचबरोबर नेहमीपेक्षा उकाडाही अधिक जाणवत होता त्यामुळे पाऊस कोसळेल अशी शक्‍यता वर्तवण्यात येत होती. त्यातच दुपारी तीनच्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला अन्‌ आभाळ भरुन आले व पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्याने मातीचा सुवास सर्वत्र पसरला असला तरी बळीराजाला दमदार पावसाची आस आहे.

अणे पठार भागाला यावर्षी भीषण दुष्काळाने ग्रासलेला आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. जून महिना सुरू झाला तरी मान्सूनपूर्व पावसाची हजरी नसल्याने बळीराजा हवलादिल झाला आहे. मात्र, रविवारी पावसाच्या हलक्‍या सरी कोसळल्याने हे मान्सून पाऊस लवकर येण्याचे संकेत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या जनावरांसाठी छावण्या सुरू झाल्या असल्या तरीपण बळीराजाचे लक्ष पावसाकडे लागला असून यंदातरी चांगला पाऊस पडेल अशी त्याला आशा आहे.

न्हावरे येथील परिसरात रविवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास गारांसह पावसाचे आगमन झाले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल, अशी अशा शेतकरी वर्गामध्ये आहे. न्हावरे गावामधे काहीवेळ गारांचा पाऊस झाला. त्यातच आज न्हावरे गावचा आठवडे बाजार असल्यामुळे आणि गारांचा पाऊस आल्याने भाजीपाला विक्रेते आणि बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांची काहीवेळ तारांबळ झाली. पाऊस उघडल्यानंतर पुन्हा उशीरापर्यंत बाजार सुरु झाला.

दरम्यान आंबळे (ता. शिरुर) येथे शिरुर – चौफुला रस्त्यावर वादळामुळे झाड पडल्याने या मार्गावर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. न्हावरे, उरळगाव, निमोणे, निर्वी, कोकडेवाडी, शिंदोडी या परिसरात पाऊस झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.