नो फॉल्ट लायबिलिटी

मोटार अपघात कायदा 1988 मध्ये अखेर केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सुधारणा करीत तथ्यातथ्याचा विचार न करता अपघातपीडिताला दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाई (नो फॉल्ट लायबिलिटी) च्या कलमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे.

अपघातातील प्रत्येक मृताला या तत्त्वावर पाच लाख रुपये मिळणार असून, गंभीर जखमी झाल्यावर आलेल्या अपंगत्वाला पाच लाखाने अपंगत्वाच्या प्रमाणाचा गुणाकार करून येणारी रक्कम आता मिळणार आहे. तसेच अपघातातील इतर जखमींना किमान 25 हजार रु. नुकसानभरपाई मिळणार असून कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तीला कमीतकमी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यांमध्ये मोटार वाहन कायद्यातील परिशिष्ट 2 हे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले होते. हा कायदा 1988 साली आल्यानंतर कलम 140 नुसार मृताला कमीतकमी 50 हजार व जखमीला 25 हजार रुपये या नो फॉल्ट लायबिलिटी अंतर्गत दिले जायचे. तद्‌नंतर 14 नोव्हेंबर 1994 साली या कायद्यात सुधारणा करून कलम 163 अ या कायद्यात समाविष्ट करणेत आले. या कलमानुसार परिशिष्ट 2 मधील तक्त्‌याप्रमाणे मृत अथवा गंभीर जखमीचे वय त्याचे वार्षिक उत्पन्न व त्याच्या वयाचा गुणांक यानुसार ही नुकसानभरपाई दिली जाऊ लागली. तसेच ही नुकसानभरपाई देताना पीडित व्यक्तीचा स्वत:साठी होणारा 1/3 खर्च वजा केला जात होता. मात्र, या परिशिष्टमध्ये अनेक चुका असल्याचे निदर्शनास आले. गुणांकाबाबत देखील अनेक चुका राहिल्या होत्या. मग 2009 साली सर्वोच्च न्यायालयाने सरला वर्मा विरुद्ध दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लि. या खटल्यात मृताच्या मागे जर 2 ते 3 व्यक्ती असतील तरच 1/3 रक्कम कपात करायची अन्यथा 4 ते 6 व्यक्ती असतील तर 1/4 कपात त्याच्या वैयक्तिक खर्चाची फक्त कपात केली जाईल असे सांगितले. जर त्याच्यामागे सहा सदस्य असतील तर 1/5 रक्कमच कपात केली जाईल असे सांगितले. तसेच भविष्यातील त्या व्यक्तीचे होणारे नुकसान गृहीत धरून चालू उत्पन्नापेक्षा 50 टक्के अधिकची रक्कम दिली पाहिजे असे स्पष्ट केले. मात्र, या सर्वाला त्याचे वय 40 वर्षापेक्षा कमी असावे, असे स्पष्ट केले. पुढे 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी नॅशनल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध प्रणय सेठी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यातही बदल करीत सर्वच वयोगटातील व सर्वच प्रकारच्या स्तरातील व्यक्तींना भविष्यातील नुकसानभरपाईचा लाभ घेता येईल असे स्पष्ट केले. तसेच अनेक वेळा मृत्यूनंतर अंत्यविधी, कुटुंबाच्या प्रेमापोटीची रक्कम वगैरे रकमा कमी जास्त दिल्या जायच्या त्या देखील कायमस्वरूपी निश्‍चित करून एकूण 70 हजार रुपये इतकी करण्यात आली व दर तीन वर्षांनी 10 टक्के वाढ करण्याचे सांगितले. एकूणच या दुसऱ्या परिशिष्टमधील जवळपास सर्वच तरतुदी बदलण्यात आल्या. प्रामुख्याने कायदा करताना अपघात पीडिताला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी हाच उद्देश असतो. मात्र, तो उद्देश सफल होत नव्हता या परिशिष्टमधील रकान्यानुसार देखील नो फॉल्ट लायबिलिटी योग्य मिळत नव्हती. मुख्यत: अपघात झाल्यानंतर चूक कुणाची होती, निष्काळजीपणा कुणाचा आहे याबाबत सत्यासत्य याची पडताळणी न करता संबंधित वाहन मालक व इन्शुरन्स कंपनीने पीडिताला मदत केली पाहिजे या कारणाने हे कलम 140 व 163 अ या कायद्यात केले गेले. मात्र दिवसेंदिवस व्यक्तीच्या जीवनाचे मोल वाढत चालले आहे रस्त्याची दुरवस्था वाढली आहे, गाड्यांचे प्रमाण वाढले आहे, असे असताना अवघ्या तुटपुंज्या रकमेने पीडिताला काहीही फरक पडत नाही. तसेच अनेकदा प्रत्यक्ष निष्काळजीपणा कुणाचा याचा तपास लागण्यासाठी साक्षीदार मिळणे अशक्‍य असते. अशा प्रसंगी या कायद्यातील कलम 163 अ मध्ये उपकलम 3 नुसार केंद्र सरकारला वेळोवेळी यामध्ये बदल करण्याचे अधिकार असताना देखील हे बदल झाले नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारने 22 मे 2018 रोजी एक अधिसूचना काढून या कलम 163 अ मध्ये बदल केले. यानुसार मृत व्यक्तीला कमीतकमी नो फॉल्ट लायबिलिटी नुसारचे मिळणारे पाच लाख, कायमस्वरूपी अपंगत्वानुसार मिळणारी कमीतकमी रक्कम 50 हजार व जखमीला कमीतकमी मिळणारी 25 हजार यात देखील 1 जानेवारी 2019 पासुन 5 टक्के वाढ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश एस आर टी सी विरुद्ध त्रिलोक चंद्रा, तसेच पुनम्माच्या खटल्यात देखील वारंवार या परिशिष्टात बदल करण्याचे सुचविले होते. तसेच विधी आयोगाच्या अहवालात देखील असे बदल सुचविले होते. त्यामुळे उशिरा का होइना केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण व योग्य बदल मोटार अपघात कायद्यात केले असून त्याचा पीडित व त्यांच्या कुटुंबीयाना नक्की फायदा होइल यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)