नोटाबंदी त्रासदायक असली, तरीही फायद्याची – डॉ. वसंत पटवर्धन 

पुणे – नीरव मोदीने कर्जबुडविल्याचे प्रकरण चर्चेत आहे. मात्र अशा प्रकारामध्ये केवळ एखादी व्यक्ती अथवा संस्था यांना जबाबदार धरता येत नाही. हे व्यवहार परस्परांवरील विश्‍वासावर चालत असतात. त्यामुळे अशा प्रकरणांचा सर्व बाजूने विचार होणे आवश्‍यक आहे, असे मत अर्थतज्ज्ञ डॉ. वसंत पटवर्धन यांनी व्यक्त केले. तसेच नोटाबंदी हा विषय दारूबंदी इतकाच कठीण आहे. परंतु त्याचा फायदा नक्कीच आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा आपला पैसा जो दहशतवादी कारवायांसाठी बाहेरील देशात जात होता, तो जायचा थांबला आहे. त्यामुळे त्रासदायक असली तरी नोटाबंदी ही देशहिताची आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डॉ. पटवर्धन यांनी वयाची नव्वदी गाठल्यानिमित्त शनिवारी त्यांचा सत्कार करण्यात आला. सिम्बॉयसिस शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. शां. ब.मुजुमदार यांच्या हस्ते हा सत्कार झाला. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांनी डॉ. पटवर्धन यांची मुलाखत घेतली. साहित्य, शिक्षण, बॅंकेचे कार्यकाळ तसेच विविध मान्यवरांच्या आठवणी या मुलाखतीत उलगडल्या.

डॉ. पटवर्धन म्हणाले, शासनाचा एक प्रतिनिधी, रिजर्व्ह बॅंकेचा प्रतिनिधी तसेच बॅंक आणि शासन यांच्याशी कोणताही संबंध नसणारा लेखापरीक्षण प्रतिनिधी अशा सर्वांचा समावेश बॅंकेच्या संचालक मंडळात असतो. मग या सगळ्यांना एकटा नीरव मोदी फसवू शकतो का? नक्कीच नाही यामध्ये सर्वांचा समावेश असतो. अशाप्रकारच्या मोठ्या व्यवहारांमध्ये बॅंकेचे प्रतिनिधीदेखील सहभागी असतात. त्यामुळे एकच व्यक्ती यासाठी जबाबदार आहे, हे म्हणणे चुकीचे ठरेल.

डॉ. मुजुमदार म्हणाले, उत्तम बॅंकर असण्यासोबतच डॉ. पटवर्धन हे उत्तम साहित्यिकही आहे. एक काळ असा होता, की महाराष्ट्र बॅंक म्हणजे डॉ. पटवर्धन असे समीकरणच झाले होते. इतकेच नव्हे, तर साहित्य क्षेत्रातही त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व आहे.

मिलिंद जोशी म्हणाले, मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लेखकांनी लिहिणे आवश्‍यक आहे. मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी डॉ. पटवर्धन यांचे योगदान महत्वाचे आहे. अर्थ क्षेत्रातील त्यांच्या लिखाणामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यात मोठी मदत मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)