नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

सासवड- रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला सासवड पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपी नाव नागनाथ बबन कांबळे (रा. दौंड) आहे. आरोपीच्या विरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये ऐंशी लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी दीपक सोपान पापळ (रा. मांढर ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत सासवड पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी दीपक पापळ व आरोपी नागनाथ कांबळे यांची जानेवारी 2018 मध्ये येरवडा कारागृहात भेट झाली होती. यावेळी कांबळे यांनी सांगितले की, मी रेल्वेमध्ये जंक्‍शनचा प्रमुख असून रेल्वे खात्यामध्ये भंगार खरेदी-विक्रीचे व्यवहारामध्ये खात्यांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. एकाच कारागृहात असल्यामुळे दोघांची चांगली ओळख निर्माण झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पापळ यांच्या पत्नी नोकरीच्या शोधात होत्या. त्यांनी मार्च 2018 मध्ये रेल्वेची नोकरी विषयक जाहिरात वाचली. त्यांनी नोकरीसाठी रेल्वेकडे परीक्षेचा अर्ज केला होता. फिर्यादी खाजगी कामाकरीता दौंड येथे गेले असता तेथे त्यांची आरोपीशी भेट झाली. यावेळी आरोपीने फिर्यादीस दौंडला येण्याचे कारण विचारले त्यावेळी पापळ यांनी पत्नीने रेल्वेमध्ये नोकरी करीता अर्ज केल्याची माहिती दिली. तेव्हा आरोपी कांबळे याने मी रेल्वेमध्ये मोठे पदावर कामास असून माझी बऱ्याच लोकांशी ओळख आहे व मी यापूर्वी देखील बऱ्याच लोकांना नोकरी लावली आहे असे सांगितले.

यावेळी दीपक पापळ यांनीही त्यांच्या पत्नीस रेल्वेत नोकरी लावण्याची विनंती आरोपीस केली. यावेळी आरोपीने यासाठी सात लाख रुपयांची मागणी केली. नोकरीच्या आशेने पापळ यांनी जुलै 2018 मध्ये साडेतीन लाख रुपये दिले व उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरले. कांबळे याने पापळ यांना फोन करून 19 सप्टेंबर रोजी रेल्वे बोर्डाची परीक्षा पुणे येथे होणार आहे. तुमच्या पत्नीचे परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन आलेले असून सायबर कॅफे मधून हॉल तिकीट नेटवरून काढून घ्या असे सांगितले. त्याप्रमाणे पापळ यांनी हॉल तिकीट नेटवरून काढून घेतले. 19 सप्टेंबर रोजी पुणे येथील रामटेकडी येथील परीक्षा केंद्रावर ती पापळ व त्यांच्या पत्नी गेल्या असता त्यांना परीक्षा केंद्राच्या बाहेर गेटवर थांबवण्यात आले.

यावेळी पापळ यांनी आरोपीस फोन करून सर्व प्रकार सांगितला. आरोपीने कोणाला तरी फोन केला. त्यानंतर पापळ यांच्या पत्नीला परीक्षेकरिता आत सोडले. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर पापळ यांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांना याबाबत सांगितले. पापळ यांचे मित्र आकाश भोईटे यांनी देखील नागनाथ कांबळे याची दौंड येथे जाऊन भेट घेतली व ते देखील पापळ यांच्याप्रमाणे रेल्वेतील नोकरीकरिता पैसे देण्यास तयार झाले. यावेळी त्यांना कांबळे यांच्या विरोधात दौंड येथे 80 लाख रुपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याचे समजले. त्यानंतर कांबळे यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली. सासवड न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महाजन पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)