नोंद : शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या – सोय की बदला घेण्याची संधी

 डॉ. तुषार निकाळजे

नुकतीच एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याची बदली झाल्याची बातमी सर्व वृत्तपत्रांत, मीडियावर आली. हा अधिकारी अत्यंत धडाडीचा, तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक, थोडक्‍यात सांगायचे तर एक आदर्श सरकारी अधिकारी असावा तसाच आहे. जनतेत प्रिय आहे. पण राजकारण्यात आणि नोकरशहांत मात्र प्रिय आहे असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. तो तसा त्यांच्यात अप्रियच आहे. त्यामुळेच त्याच्या वारंवार बदल्या होत असतात. आता झालेली बदली ही या अधिकाऱ्याच्या सेवेतील 13 वर्षांच्या कालावधीतील 14 वी बदली आहे.

आणि त्याहून गमतीची गोष्ट (बदल्यांच्या या काहीशा बदला घेऊ मालिकेला आणखी काय म्हणणार आपण?) म्हणजे 14 वी बदली व 13 वी बदली यातील कालावधी फक्‍त 22 दिवसांचा आहे. सामान्यत: तीन वर्षांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची रूढी आहे. पण येथे केवळ 22 दिवसांत हा प्रामाणिक, कर्तबगार अधिकारी कोणाला तरी नकोसा झाला. याचेच आश्‍चर्य वाटते असे नाही, तर गेल्या दोन वर्षांत त्यांच्या पाच वेळा बदल्या झाल्या याचेही आश्‍चर्य वाटते. यापूर्वी दुसऱ्या एका सनदी अधिकाऱ्याच्या 14 वर्षांत 17 वेळा बदल्या झाल्या होत्या. हे देखील जनतेच्या स्मरणात आहे. या अधिकाऱ्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाते.

सरकारी व्यवस्थेमध्ये बदली हा विषय आहेच. अगदी अपरिहार्य आहे. साधारणतः तीन वर्षांनी बदली करण्याची पद्धत आहे. असे सर्वसामान्य जनांना माहीत आहे. ही “बदली’ म्हणजे काय? याची चर्चा या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्याकरीताच निसर्गाने उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू निर्माण केले आहेत. त्या अनुषंगाने वातावरण, जमीन, पाणी, पक्षी हे त्यांचेशी जुळते घेत असतात. पशु-पक्षी या वातावरणाशी मिळतं-जुळतं घेण्यासाठी स्थलांतर करतात. कधी-कधी डॉक्‍टर रोग्यास सांगतात “”तुम्हाला हवापालटाची आवश्‍यकता आहे. जरा दुसऱ्या ठिकाणी जाऊन या, थोडा हवाबदल करा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

” झाडांची पाने-फुले गळून नवीन पानेफुले येणे हा देखील बदलाचा एक भाग. पण हा झाला नैसर्गिक बदल. पण जीवनात काही कृत्रिम बदलही घडत असतात. घडवले जात असतात. लग्न झालेली मुलगी सासरी जाणे. लग्न होऊन सासरी गेलेली मुलगी सणासुदीला माहेरी येणे, जावयांनादेखील सणासुदीला जेवणासाठी, मानपानासाठी बोलविणे हा सांस्कृतिक किंवा कौटुंबिक बदल म्हणावा लागेल. पण हा आहे हवाहवासा वाटणारा, नातीगोती घट्ट करणारा बदल.

सरकारी व्यवस्थेत काही बदल घडवण्यासाठी नियम तयार केले आहेत. त्याला व्यवस्थेच्या भाषेत “बदली’ असे संबोधले जाते. बदली होणे, बदली करणे, बदली करवून घेणे असे काही पोटभेद आहेत त्यात. परंतु “बदली’ ही प्रामुख्याने प्रशासकीय सोयीकरीता केली जाते. त्याचा संबंध कोणत्याही कृत्रिम किंवा नैसर्गिक कारणांशी नसतो. प्रशासकीय सोय याचा अर्थ व्यवस्थेतील शब्दकोशात दिलेला दिसत नाही. असो. प्रशासकीय सोय म्हणजे नेमके काय असते? या संदर्भातील खालील काही परिस्थिती व प्रकरणांचा अर्थ लावल्यास आपणांस समजू शकेल असे वाटते.

भारतामध्ये इंग्रजांच्या वसाहत काळापासून प्रशासन व्यवस्था अस्तित्वात आली. इंग्रजांच्या काळापासूनच व्यवस्थेत बदली हा प्रकार दिसून येतो. याचे एक उदाहरण म्हणजे इंग्रजांनी भारतातील महाराष्ट्रात नेमलेल्या एका राज्यपालांनी एक इमारत बांधली, ती इमारत त्यावेळी आणि आजही भारताच्या इतिहासात नामवंत म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु ही इमारत बांधताना मंजूर केलेल्या रकमेच्या थोडी जास्त रक्‍कम खर्च केल्यामुळे त्या राज्यपालांची इंग्रज सरकारने ऑस्ट्रेलिया येथे बदली केली. तदनंतर भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांनी केलेल्या बऱ्याच नियमांचा आजही वापर करतात.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या सामान्यत: दर तीन वर्षांनी होत असतात. परंतु काहींच्या बदल्यांना मात्र, हा नियम का लागू होत नाही? हा एक गहन प्रश्‍नच आहे. कोणत्याही व्यवस्थेत काही ध्येयवेडी माणसे (मॅन ऑन द मिशन) असतात. आपण भले आणि आपले काम भले, असा त्यांचा स्वभाव असतो. नियमांव्यतिरिक्‍त इतर कोणत्याही गोष्टीशी तडजोड करण्याची, करू देण्याची त्यांची प्रवृत्ती नसते. त्यामुळे इतर घटकांशी त्यांचे कमी प्रमाणात मिळते-जुळते असते. ज्यांचे त्यांच्याशी मिळते-जुळते नाही, अशा लोकांच्या डोळ्यांत अशी मंडळी सलतात आणि मग त्यांचा बदल्यांच्या मार्गाने अगदी सफाईदारपणे काटा काढला जातो. पण ही नाणी खणखणीत वाजणारी असल्याने कोठेही टाकली की त्यांचा आहे तसाच आवाज येतो. मग न पटल्याने तेथूनही त्यांची पुन्हा तिसरीकडे बदली होते.

ही मंडळी बऱ्याच वेळा जनहितासाठी काही धडक निर्णय घेतात. त्या प्रक्रियेत काही राजकारणी दुखावले जातात. हितसंबंध बिघडतात. पाणीप्रश्‍न, वैद्यकीय प्रश्‍न, वीज प्रश्‍न, रहदारीचे प्रश्‍न, वाहतूक प्रश्‍न असे राजकीय हितसंबंध असलेले जनतेचे प्रश्‍न हे अधिकारी धडाडीने सोडवितात वा सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु यामध्ये काही घटकांचे आर्थिक हितसंबंध दुखावले जात असल्याने त्यावरती त्याची “बदली’ करण्याचा पर्याय पुढे येतो.

असल्या गोष्टी टाळण्यासाठी वर्ष 2003 पासून बदल्यांचे नियम कडक करण्यात आले आहेत. “”कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनीयमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अध्यादेश.” असे या नियमास सुटसुटीत नाव दिले गेले. यामधील तरतुदींचा सोईस्कर अर्थ प्रत्येकाने लावला, तरीही जे घडायचं ते घडतच असतं. या नियमात एक पोटनियम असा आहे, “”पती-पत्नी एकाच जिल्ह्यात कार्यरत असतील तर त्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली करू नये.” परंतु प्रामाणिक पतीची परजिल्ह्यात प्रथम बदली केली जाते आणि नंतर पत्नीचीदेखील बदली होते. मग मुलांच्या शाळांची काय कसरत होत असेल? परगावी बदली झालेले पती आठवड्यातून फक्‍त रविवारी कुटुंबासोबत असतात. बाहेरगावी राहणे, खाणे, प्रवास यांच्या खर्चिक कामापेक्षा कौटुंबिक स्वास्थ्य जास्त खालावते.

काही व्यवस्थांमध्ये बदल्यांसाठी तीन गावांचा, शहरांचा पर्याय दिला जातो. परंतु यामध्ये सट्टेबाजार झाल्याचे प्रसारमाध्यमांनी उघड केले आहे. काही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर जनतेनेच आक्षेप घेतले आहेत. त्यांची बदली रद्द होण्यासाठी जनतेने आंदोलन केल्याची उदाहरणे आहेत. तसेच एखाद्या प्रामाणिक व कोणत्याही संघटनेचा सभासद, गटात सहभाग नसलेल्या कर्मचाऱ्याची परगावी बदली झाल्याने कार्यालयाचे कामकाज बंद करून नियुक्‍ती अधिकारी, प्रशासन यांच्यावर कामगार संघटना, कर्मचारी यांनी दबाव आणल्याने बदल्याही रद्द झाल्याची उदाहरणे आहेत. काही कार्यालयांतील काही विभागांमध्ये व्यवस्थापन परिषद मान्यताप्राप्त काही भत्ते, ज्यादा कामाचा मोबदला असे वेतनाव्यतिरिक्‍त आर्थिक फायदे मिळतात.

अशा ठिकाणी वर्षानुवर्षे कामगार संघटनांचे सदस्य, अधिकाऱ्यांशी हितसंबंध (?) असलेली मंडळी ठाण मांडून बसलेली आढळतात. दरवर्षी बदलीस पात्र असणाऱ्यांची नावे प्रशासन जाहीर करीत नाहीत. एखाद्या सेवकाने यावर आक्षेप घेतल्यास त्यालाच कारणे दाखवा नोटीस दिली जाते. चक्‍क नागरी सेवा शिस्त व अपिल नियमानुसार पदोन्नती रोखणे, वार्षिक वेतनवाढी रोखण्यापर्यंत प्रशासनाची मजल जाते.

नियमबाह्य बदल्या करणाऱ्या नियुक्‍ती अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्याचे टाळत असतात. त्यामुळे गव्हाबरोबर किडे रगडण्याचा प्रकार दृष्टीस पडतो. डोईजड किंवा कामचुकारांना बडतर्फ किंवा निलंबनाचे धारिष्ट्य केले जात नाही. परंतु त्यांची अशा ठिकाणी बदली करतात, तो अविकसित भाग असतो, दुर्गम असतो, याला एक प्रकारे शिक्षेच केंद्र समजल जातं. अशा ठिकाणी बदली झाल्यानंतर कंटाळून काहींनी ऐच्छिक सेवानिवृत्ती किंवा राजीनामे दिली असल्याची उदाहरणे आहेत. वरील काही प्रकरणांचा बारकाईने अभ्यास केल्यास अनेकदा “बदली’ या प्रकाराचा एक हत्यार म्हणून वापर केलेला दिसतो. बदली हा हा प्रकार “बदला’ घेण्यासाठी किंवा सूड भावनेने केलेल्याची उदाहरणे समोर दिसतात. खरं तर तसं होऊ नये, केलं जाऊ नये असे वाटते. आणि याची दखल किंवा नोंद संबंधितांनी घेतल्यास सेवेचा प्रवास सुखकर होईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)