#नोंद: कोयले की दलाली में हाथ काले

डॉ. तुषार निकाळजे

हल्ली राफेल प्रकरंण गाजत आहे, किंवा गाजवले जात आहे. याचा सारा रोख आहे, तो त्या विमानांच्या किमतींबाबत, यात काही तरी काळेबेरे आहे, कोणीतरी दलाल आहे, कोणी दलाली घेतली आहे, यावर विरोधकांचा रोख आहे, बोफोर्सपासून असे आरोप प्रत्यारोपांचे आणि कमिशन एजंटांचे-दलालांचे पेव फुटले आहे, आणि ते गाजत आहे. घराघरापर्यंत पोहचत आहे. अगदी प्रत्येक व्यवहारात असे काहीतरी काळेबेरे असते, किंवा असल्यचा संशय असतो.

प्राचीन काळी मानव गुहेमध्ये राहात होता. त्यावेळी उपजिवीका करण्यासाठी प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खात होता. नंतर झाडांची फळे, कंदमुळे अशा वस्तुंचा उदरनिर्वाहासाठी वापर करीत होता. पुढे शेती करू लागला. स्वतः पिकविलेली किंवा तयार केलेली वस्तू दुसऱ्या व्यक्‍तीला देऊन त्याच्याकडील वस्तू स्वतः वापरण्यासाठी घेऊ लागला. अशा प्रकारे नेहमीच वस्तूंची अदलाबदल करणे अशक्‍य होवू लागले. यातूनच मध्यस्थ म्हणजे एजंट-दलाल ही जमात उदयास आली. देवाण-घेवाण करणाऱ्या व्यक्‍तींमधील दुवा म्हणजे दलाल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वी याला सामाजिक स्वरूप होते. हा व्यवसाय प्रामाणिकपणे होत होता. जसजशी मानवाची प्रगती होत गेली आणि व्यवहारात चलनाचा वापर होऊ लागला तसे एजंट या संकल्पनेला आर्थिक महत्व प्राप्त झाले. आज कोणतीही वस्तू घेताना दलाल/एजंट/आडत्या महत्त्वाचा मानला जातो. मंडई किंवा मार्केटमध्ये दलालाशिवाय व्यवहार होतच नाही. या एजंटगिरीस नंतर अर्थशास्त्र, अकौंटस्‌, वित्त यांच्या भाषेत कमिशन एजंट, ब्रोकर अशी नावे प्राप्त झाली. त्याचे पूर्वीचे सामाजिक स्वरूप जाऊन आता त्यास आर्थिक महत्त्व प्राप्त झाले. टक्‍केवारीची भाषा सुरू झाली. व्यवहारात पैशांची मोजणी सुरू झाली. तसतसा मध्यस्थ या शब्दाचा अर्थ बदलू लागला. मध्यस्थ ही व्यक्‍ती वास्तविक त्याच्या व्यवसायाशी प्रामाणिक समजली जाते. ही संकल्पना आर्थिक व्यवहारात 1571 मध्ये अस्तित्वात आली. पण याच काळात मूळ दलाल/मध्यस्थ/एजंट या संकल्पनेला वेगळं वळण लावणारी मंडळी जन्माला आली. आणि हा पेशा किंवा व्यवसाय बदनाम होऊ लागला.

आजकाल तर नातीदेखील व्यावहारिक-हिशोबी झाली आहेत. आदर्श, तत्त्वे, माणुसकी, नाती, ओळख यांचंदेखील रूपांतर लाभदायी व्यवहारात करणारी मंडळी तयार झाली आहेत. स्वत:ला निष्णात सल्लागार म्हणवून घेऊ लागली आहेत. यातून प्रत्यक्ष आर्थिक लाभाबरोबरच अन्य स्वार्थ साधण्यात येऊ लागला. यामध्ये बरेच बळीचे बकरे झाले. आणि मलई खाणारे मस्तवाल झाले.

वेगवेगळ्या व्यवस्थांमधील अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा, कॉन्फरन्स होतात. त्यामध्ये त्यांच्या एकमेकांशी ओळखी होतात आणि त्यातून कालांतराने व्यावहारिक गणिते जुळतात. त्या हितसंबंधांतून मुलामुलीची लग्ने होऊन नातेसंबंध जुळतात, व्यावसायिक, मंत्री हे देखील याला अपवाद नाहीत. पैसा, प्रतिष्ठा, शैक्षणिक पात्रता यांचे या व्यवहारात निकष लावले जातात. (परंतु याला अपवाद असणारी काही गोरगरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, सुशिक्षित, अशिक्षित देखील आहेत.) गट, संघटना, समूुह, आणि स्वतःला निष्णात समजणारी मंडळी व्यवहारातील मध्यस्थ या संकल्पनेमध्ये स्वतःला वाहून घेऊ लागली. एखाद्या ऍडमिशन पासून ते सबमिशनपर्यंत सर्व बाबतीत कमिशनवर व्यवहार होताना दिसतात. एखादी व्यक्‍ती डोईजड झाली, त्यासाठीही निष्णात सल्लागार (योग्य मोबदलयावर) सल्ला देताना दिसतात.

पण यांना कागदोपत्री किंवा पुराव्यानिशी पकडता येणे अशक्‍य बाब आहे. अशांचे व्यवहार वेगळेच. जगातल्या कोणत्याही तपास यंत्रणेला ते शोधण्यात अद्याप कमी प्रमाणात यश आले आहे. अशा व्यवहारांपोटी अनेक मंत्री, पुढारी, अधिकारी यांनी तुरूंगवारी केल्याची उदाहरणे आहेत. याला राजकारणाच्या भाषेत बुद्धिजीवी राजकारण (नॉलेज पॉलीटिक्‍स) म्हटले जाते. पद, पैसा, प्रतिष्ठा, खुर्ची मिळण्यासाठी दुसऱ्याच्या हातातील बाहुले होणे आणि कुठेतरी स्वतःची बुध्दी-अस्तित्व तारण ठेवणे अशा प्रकरणांमुळे काही व्यवस्था बदनाम झाल्या. समाजाचा व्यवस्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.

मात्र काही प्रामाणिक आधारस्तंभ असल्यानेच या व्यवस्था आजही तग धरून आहेत. याची जागतिक स्तरावरील क्रमवारीदेखील दरवर्षी प्रकाशित होत असते. चांगल्या गोष्टींना खतपाणी घालण्यापेक्षा त्याचा समूळ नायनाट करणारी मंडळीच जास्त प्रमाणात उदयास आली. पण हे सारे तात्पुरते असते याला इतिहास साक्षी आहे. प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा यांच्या जोरावर असा चक्रव्यूह भेदणारा अभिमन्यू निर्माण होत असतो आणि तो महाभारतातील अभिमन्यूप्रमाणे मारला जात नसतो. तर विजयी होत असतो, ही मोठी आश्‍वासक गोष्ट आहे. पूर्वी कोयले की दलाली में हात काला म्हणत. आता तसे म्हणायचीही सोय राहिली नाही. कारण हॅंडग्लव्हज वापरण्याची सुविधा निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)