नेहरू स्मारकावरील घाला (अग्रलेख)

नेहरूंप्रमाणेच देशाच्या अन्य पंतप्रधानांचाही गौरव व्हायला पाहिजे, या विषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही पण त्यासाठी नेहरूंच्या स्मारकाची मोडतोड मात्र पटणारी नाही. नेहरू आणि संघ परिवारात वैचारिक मतभेद आहेत आणि ते असू शकतात. पण म्हणून नेहरूंची स्मृतीच पुसून टाकण्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. नेहरू हे केवळ कॉंग्रेसचे नव्हते तर ते साऱ्या देशाचे होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे. 
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे दिल्लीतील ज्या वास्तुत राहिले त्या तीन मूर्ती भवनात सध्या नेहरुंचे स्मारक आहे आणि नेहरुंच्या विचाराने काम करणाऱ्या अनेक संस्थांची कार्यालये तेथे आहेत. पंडित नेहरुंची आठवण म्हणून ही तीन मूर्ती भवनाची इमारत संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. दिल्लीला येणारे बहुतेक पर्यटक या वास्तुला भेट देतात. पण या वास्तुची आता संपूर्ण फेररचना केली जात असून तेथे केवळ नेहरूच नव्हे तर देशाच्या अन्य पंतप्रधानांचेही स्मारक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सुपिक डोक्‍यातून आलेल्या या कल्पनेचा हेतू उद्दात्त दिसत असला तरी त्यांचा अंतस्थ हेतू नेहरूंचा वारसा पुसून टाकण्याचाच आहे असा संशय व्यक्‍त करणारे पत्र माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मोदींना पाठवले आहे.
संघ परिवाराचा नेहरूंवर कायमच रोष राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीच्या सरकारकडून नेहरुंच्या स्मारकाची ही पद्धतशीर मोडतोड केली जात असून त्याद्वारे नेहरूंचा वारसा पुसण्याचा प्रयत्न केला जात आहे असेच मनमोहनसिंग यांच्या पत्रातून सूचित केले आहे. नेहरूंच्या स्मारकात कोणतीही ढवळाढवळ न करता हे स्मारक आहे तसेच ठेवा अशी स्पष्ट सूचनाही मनमोहनसिंग यांनी मोदींना केली आहे. पंडित नेहरू हे केवळ कॉंग्रेसचे नव्हते तर ते साऱ्या देशाचे होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिपीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे अशी अपेक्षा मनमोहनसिंग यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात या स्मारकात कोणताही फेरबदल करण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता पण विद्यमान सरकारने हा प्रयत्न चालवला असल्याबद्दल मनमोहनसिंग यांनी खेद व्यक्‍त केला असून त्यातून आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
तीन मूर्ती भवन ही नेहरूंची खासगी मालमत्ता नव्हे ही बाब खरी आहे. ही वास्तु ब्रिटिश काळात निर्माण केली गेली. ब्रिटिश आर्किटेक्‍ट रॉबर्ट रस्सेल यांच्या कल्पनेतून तब्बल 30 एकर जागेत ही वास्तु उभारण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश लष्कराच्या प्रमुखांचे हे वास्तव्याचे ठिकाण होते. 1922 साली या वास्तुचे निर्माण करण्यात आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते पहिल्या पंतप्रधानांचे निवासस्थान झाले. या वास्तुत नेहरू पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे सुमारे सोळा वर्षे वास्तव्याला होते. देशाच्या उभारणीत उत्तुंग योगदान दिलेल्या या महान नेत्याच्या स्मरणार्थ तेथे नंतर त्यांचे स्मारक करण्यात आले. आज तेथे नेहरू संग्राहालय आणि वाचनालय आहे. सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या ताब्यात हे स्मारक आहे. 1964 साली स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरू निधीचेही कार्यालय तेथे आहे. तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी हा निधी स्थापन केला आहे. नेहरू प्लॅनेटोरियम आणि एक स्वतंत्र अभ्यास केंद्रही तेथे आहे. या साऱ्या संस्था पर्यटक आणि अभ्यासकांचे एक आकर्षण आहे. त्याची मोदींनी फेररचना हाती घेतली असून तब्बल 270 कोटी रूपये खर्चाच्या या योजनेचे काम तेथे गेल्या अनेक दिवसांपासून कोणताही गाजावाजा न करता सुरू आहे.
वास्तविक गाजावाजा न करता एखादे काम करण्याचा मोदींचा स्वभाव नाही पण नेहरूंच्या या स्मारकात देशाच्या अन्य पंतप्रधानांचेही स्मारक उभारून नेहरूंचा वारसा दुय्यम ठरवण्याचा त्यांचा मनोदय असल्याची कुणकुण कॉंग्रेस नेत्यांना लागली आणि त्यात मनमोहनसिंग यांनी पुढाकार घेऊन या स्मारकाचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न होऊ नये असे पत्र त्यांना पाठवले. मनमोहनसिंग यांनी पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर वाजपेयी यांनी केलेल्या भाषणाचा काही अंशही या पत्रात उल्लेखित केला असून वाजपेयींनी नेहरूंचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. वाजपेयींच्या या भावनांची कदर केली पाहिजे अशी अपेक्षाही मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासही या स्मारकात आहे. नेहरूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दहा वर्षे कारागृहात घालवली असून स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारताच्या उभारणीत ऐतिहासिक योगदान दिले असल्याने या स्मारकात नेहरूंच्याच कार्यावर प्रामुख्याने प्रकाश झोत असला पाहिजे त्यामुळे त्यात फेरबदल न करण्याची कळकळीची विनंती मनमोहनसिंग यांनी केली आहे.
मनमोहनसिंग यांच्या या विनंतीला मोदी कितपत धूप घालणार हे पहावे लागेल. कारण या प्रकल्पाचे बरेचसे काम एव्हाना पुढे गेले आहे. झालेले काम नाहीसे करणे आणि ते पुन्हा पूर्वी सारखे करणे हे एक दिव्यच असले तरी मोदींनी गुपचुपपणे नेहरूंच्या या स्मारकात हस्तक्षेप करून तेथे मोडतोड करणे लोकमानसालाही मान्य होण्यासारखे दिसत नाही. नेहरूंप्रमाणेच देशाच्या अन्य पंतप्रधानांचाही गौरव व्हायला पाहिजे, या विषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही पण त्यासाठी नेहरूंच्या स्मारकाची मोडतोड मात्र पटणारी नाही. नेहरू आणि संघ परिवारात वैचारीक मतभेद आहेत आणि ते असू शकतात. पण म्हणून नेहरूंची स्मृतीच पुसुन टाकण्याच्या कृत्याचे समर्थन करता येणार नाही. मोदींनी नेहरूंच्या तोडीचे काम करून दाखवून त्यांची स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला तर लोक त्याचे स्वागतच करतील किंबहुना त्यांनी तसेच काम करायला हवे अशी लोकांची अपेक्षा आहे. 
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)