काठमांडू – नेपाळच्या पूर्वेकडील जलविद्युत प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये आज एक बॉम्बस्फोट झाला. भारताच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन काही आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते.
आज झालेल्या बॉम्बस्फोटामुळे अरुण 3 या 900 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाची कुंपणाची भिंत उद्ध्वस्त झाली. स्फोटामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या स्फोटाच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे संखुवासभा जिल्ह्याचे मुख्य अधिकारी सिव राज जोशी यांनी सांगितले. नेपाळमधील कोणत्याही संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हा प्रकल्प 2020 पासून सुरू होणार होता. या प्रकल्पासाठी भारत सरकारच्या सतलज जल विद्युत निगमबरोबर 25 नोव्हेंबर 2014 साली नेपाळचे तत्कालिन पंतप्रधान सुशिल कोईराला आणि मोदी यांच्या उपस्थितीमध्ये करार करण्यात आला होता. नेपाळमध्ये भारतीय मालमत्तेच्या आवारात या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा स्फोट झाला आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी बिरातनगरमधील भारतीय दूतावासाच्या कार्यालयाजवळ प्रेशर कुकर बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला होता. त्या स्फोटामध्ये दूतावासाच्या इमारतीचे नुकसान झाले होते.
नेपाळमध्ये असलेल्या वीजेची टंचाई दूर करण्यासाठी भारताच्या सहकार्यातून हा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत होता. या प्रकल्पातून नेपाळमधील घरगुती वापरासाठीची वीज उपलब्ध होणार होती. या प्रकल्पातून नेपाळमध्ये 1.5 अब्ज डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक येणे आणि हजारो लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा