कराड, दि. 3 (प्रतिनिधी) – जिथे गर्दी, तिथे चोरटे, हे अतूट समीकरण आहे.जत्रा-यात्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, लग्न समारंभ, राजकीय सभा अशा ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन चोरटे नागरीकांचा मौल्यवान ऐवज लंपास करतात.
सातार्यात मंगळवारी (दि. 2) खा. उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उसळलेल्या गर्दीत चोरट्यांनी अनेकांच्या खिशावर हात मारला. तब्बल 38 तोळे सोन्याचा ऐवज आणि हजारो रूपयांवर डल्ला मारला. या घटनेची जिल्हाभर खमंग चर्चा आहे. खा. उदयनराजेंच्या प्रचारार्थ कराडात झालेल्या शरद पवारांच्या सभेवेळीही चोरट्यांनी अनेकांचे खिसे कापले होते.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांची धामधूम सुरू आहे. या रणधुमाळीत चोरटे दिवाळी साजरी करत आहेत. अर्ज दाखल करताना आणि मोठ्या
नेत्यांच्या प्रचार सभांना होणार्या गर्दीत चोरटे हात धुवून घेत आहेत. हजारोंच्या गर्दीत चोरटे शोधणे म्हणजे वादळात दिवा लावण्यासारखाच प्रकार. त्यामुळे पोलीस किती ठिकाणी पुरणार, असाही सवाल उपस्थित होतो. म्हणून गर्दीत जाताना अंगावरील मौल्यवान ऐवज आणि खिशातील पैशाची स्वत:च काळजी
घेणे महत्वाचे ठरते. उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी मोठे शक्तीप्रदर्शन झाले. उदयनराजेंचे आगमन झाले, त्यावेळी त्यांच्या जवळ जाण्यासाठी रेटारेटी झाली. त्याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी हातचलाखी केली. मफलर अंगावर टाकून गळ्यातील चेन लंपास करण्याचा फंडा चोरट्यांनी
अवलंबिला. तसेच एकाने ऐवज चोरला की तो दुसर्याकडे, दुसर्याने तिसर्याकडे पास करण्याची चलाखीही चोरट्यांनी केली. काही पुढार्यांचे खिसेही चोरट्यांनी साफ केले. मात्र, सामान्य कार्यकर्त्यांच्या खिशातील पैशाची चोरी झाली, त्यांचे चेहरे मात्र पाहण्यालायक झाले होते. असा एक कार्यकर्ता पक्षाच्या एका पदाधिकार्याजवळ काकुळतीला आला होता. त्यावर तो
पदाधिकार म्हणाला, आता मी काय करू? ऐवज आणि पैशाची चोरी झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आल्यानंतर असे गंमतीदार किस्सेही घडले. त्यामुळे नेते, कार्यकर्त्यांनो…खिसे सांभाळा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कराडातही घडला होता असाच किस्सा..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे 2004 मध्ये पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री झाल्यानंतर कराडातील शिवाजी स्टेडियमसमोरील लिबर्टी मंडळाच्या मैदानावर त्यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कोल्हापूर नाक्यापासून भव्य मिरवणुकीने ते लिबर्टीच्या मैदानावर आले. त्याठिकाणी त्यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम झाला. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चोरट्यांनी आपले खिसे कापल्याचे लक्षात आले. त्यात एका मंत्र्याचाही समावेश होता.
त्यांच्या खिशातून 60 हजार रूपये लंपास झाले होते. व्यासपीठावर जाताना झालेल्या गर्दीचा चोरट्यांनी त्यावेळी फायदा घेतला होता.
कराडात तीन हजार, सातार्यात पाच हजार लंपास..
कराडातील शरद पवारांच्या सभेला आलेल्या एका वाडीतल्या कार्यकर्त्याच्या खिशातील तीन हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले होते. त्यानंतर त्या वाडीशेजारच्या आणि तालुक्यातील सधन, पुढारलेल्या गावच्या एका पदाधिकार्याच्या खिशातून सातार्यात चोरट्यांनी पाच हजार लंपास केले. त्यामुळे कराडची सभा आणि सातारचे शक्तीप्रदर्शन दोघांना आठ हजाराला
पडल्याची गमतीदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.