नीरज चोप्राला भालाफेकीत सुवर्णपदक 

नवव्या दिवशी भारताला तीन रौप्यपदकांसह पाच पदके 
जकार्ता: भारताच्या केवळ 20 वर्षे वयाच्या नीरज चोप्राने पुरुषांच्या भालाफेक प्रकारांत सुवर्णपदकाला गवसणी घालताना आशियाई क्रीडास्पर्धेतील नवव्या दिवशी भारताचा तिरंगा फडकत ठेवला. नीरजने 88.06 मीटरची सर्वोत्तम फेक करताना निर्विवादपणे सुवर्णपदकावर हक्‍क सांगितला. कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना नीरजने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. आशियाई स्पर्धेतील भालाफेकीत भारताचे हे पहिले सुवर्णपदक, तसेच एकूण दुसरे पदक ठरले आहे. याआधी गुरतेज सिंगने 1982 दिल्ली आशियाई स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते.
नीरजच्या यशामुळे भारताने या स्पर्धेत आठवे सुवर्णपदक जिंकले आहे. याआधी आजच्या दिवसांत सुधा सिंग आणि धरुन अय्यासामी या धावपटूंनी अनुक्रमे 3000 मीटर स्टीपलचेज आणि पुरुषांच्या 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तसेच नीना वाराकिलने महिलांच्या लांब उडीत भारताला आजच्या दिवसातील तिसरे रौप्यपदक मिळवून दिले. सायना नेहवालने कांस्यपदक निश्‍चित केल्यामुळे भारताने आजच्या नवव्या दिवशी एकूण पाच पदकांची कमाई केली. भारताने 8 सुवर्ण, 13 रौप्य व 20 कांस्य अशी 41 पदकांची कमाई करीत पदकतालिकेत नववे स्थान राखले आहे.
नीरज चोप्राने आज पहिल्या प्रयत्नांत 83.66 मीटर अशी आत्मविश्‍वासपूर्ण फेक केली. ही नीरजची सर्वोत्तम फेक नसली, तरी त्याला सूर गवसला असल्याचे दाखवून देणारी होती. दुसऱ्या प्रयत्नांत नीरजचा फाऊल झाला. परंतु तिसऱ्याच प्रयत्नांत 88.06 मीटर अशी विक्रमी फेक करताना नीरजने सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. चौथ्या प्रयत्नात नीरजला 86.36 मीटर इतकीच फेक करता आली. परंतु पाचव्या प्रयत्नांत पुन्हा एकदा 88.06 मीटर भाला फेकताना त्याने सुवर्णपदकावर शिक्‍कामोर्तब केले. चीनच्या लियू क्‍विझेनने (82.22 मीटर) रौप्यपदक, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने (80.75 मीटर) कांस्यपदकाची निश्‍चिती केली.
नीरजची नेत्रदीपक आगेकूच 
नीरजने आंतरराष्ट्रीय भालाफेकीतील आपली वाटचाल 2013 मध्ये, म्हणजे वयाच्या जेमतेम 15व्या वर्षी सुरू केली. परंतु त्याला पहिले यश 2016 दक्षिण आशियाई स्पर्धेत मिळाले. नीरजने या वेळी 82.23 मीटर फेक करताना राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी साधून सुवर्णपदकही पटकावले. त्यानंतर त्याने पोलंडमध्ये झलेल्या 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत 86.48 मीटरचा विश्‍वविक्रम प्रस्थापित करताना सुवर्णपदक जिंकले. नाव नोंदणीच्या अंतिम मुदतीचा गोंधळ झाल्यामुळे नीरज रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकला नाही. परंतु 2017 आशियाई स्पर्धेत त्याने 85.23 मीटर फेक करीत आणखी एक सुवर्णपदक पटकावले. यंदाच्याच वर्षी गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरजने 86.47 मीटर अशी मोसमातील सर्वोच्च फेक करताना राष्ट्रकुल पदार्पणात सुवर्णपदक जिंकणाऱ्यांच्या यादीत स्थान मिलविले. तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील भालाफेकीत सोनेरी यश मिळविणारा तो पहिला भारतीय ठरला.
मे-2018 मध्ये दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरजने 87.43 मीटर फेक करताना नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. जर्मनीचे विश्‍वविक्रमवीर भालाफेकपटू उवे हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली नीरज सराव करतो. भालाफेकीत 100 मीटरचा टप्पा पार करणारे उवे हॉन हे जगातील एकमेव खेळाडू आहेत.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)