निवडणुकीच्या वादातून अज्ञाताचे कृत्य ः तिन्हेवाडी, पेठ, जैदवाडीत तीव्र

राजगुरुनगर-निवडणुकीच्या वादातून राजगुरूनगर येथील खेड घाटातील इंदिरा पाझर तलावाचे पाणी अज्ञात व्यक्तींनी सोडून दिल्याने तिन्हेवाडी, पेठ, जैदवाडीत तीव्रपाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक करावी, करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सांडभोरवाडी (तिन्हेवाडी, ता. खेड) ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पराभूत उमेदवारांच्या अज्ञात समर्थकांनी तिन्हेवाडी तसेच जैदवाडी, पेठ (ता. आंबेगाव) या गावच्या पाणी योजना असलेल्या इंदिरा पाझर तलावातील पाणी सोडून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा असताना हे पाणी वाया गेल्याने या तीनही गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
संयुक्त ग्रामपंचायत सांडभोरवाडीची निवडणूक नुकतीच झाली. सोमवारी (दि. 28) मतमोजणीनंतर निकाल लागले. हार-जीतच्या धुंदीत ग्रामस्थ असताना त्याच रात्री निवडणुकीत अपयश आले म्हणून अज्ञात व्यक्तीने तलावाचे पाणी सोडून दिले. सकाळी सर्वांच्या लक्षात आले; मात्र तोपर्यंत इंदिरा पाझर तलावात फक्त गाळ शिल्लक राहिला होता. या तलावातून तिन्हेवाडीसह जैदवाडी, पेठ (ता. आंबेगाव) या गावांच्या पाणी योजना आहेत. पाणी सोडून दिल्याने या गावांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. तिन्हेवाडी वन संरक्षण समितीच्या माध्यमातून तलावा लगतच्या डोंगर परिसरात वनराई बहरलेली आहे. या वनराईत मोरांची संख्या मोठी आहे. मोरासह ससा, मुंगूस, कोल्हे, लांडगे, माकडे, लांडोर आदी वन्य पशु, पक्षांचा मोठा वावर आहे. राष्ट्रीय पक्षी मोराचे येथे थव्याने वावर आहे. या वन्य पशु, पक्षाचे पाण्या वाचून मोठे हाल होणार आहेत.
ऐन उन्हाळ्यात एवढे पाणी वाया गेल्याबद्दल ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत. नवनिर्वाचित सरपंच अरुण थिगळे व सहकाऱ्यांनी तलावस्थळी भेट दिली. तिन्हेवाडी गावात पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी नवनिर्वाचित सरपंच थिगळे यांच्यासह मावळत्या सरपंच कविता पाचारणे, ग्रामसेवक किशोर रायसिंग-वाकडे यांनी गावातील तीन विभागातील खासगी विहिरीत तातडीने पाईप लाईन करून योजनेच्या टाक्‍यांमध्ये पाणी टाकण्याची व्यवस्था केली. तिन्हेवाडीत गुरुवारी (दि. 31) सुरळीत पाणी पुरवठा सुरु होता. शिवाय अरुण थिगळे यांच्याकडून टॅंकरद्वारे पाणी वाटप करण्यात येत आहे. तसेच उद्योजक महेंद्र पाचारणे यांच्याकडून यापूर्वीच स्वत:च्या कुपनलिकेतून गावात मध्यवर्ती ठिकाणी नळकोंडाळी काढण्यात आली आहेत.
निवडणुकीच्या वादातून अज्ञात समाज कंटकानी पाणी सोडून दिल्याने गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तिन्हेवाडीला टॅंकर सुरू झाले; मात्र जैदवाडी, पेठ (ता. आंबेगाव) या गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. अज्ञात व्यक्तींनी अचानक पाझर तलाव फोडल्याने पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात तीन गावातील नागरिकांवर वणवण फिरण्याची वेळ आली आली आहे. पाझर तलाव फोडून पाणी खाली सोडणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेऊन त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • असे कृत्य करणाऱ्याला कडक शिक्षा व्हावी
    तिन्हेवाडीचे ग्रामस्थ विठ्ठल पाचारणे यांनी सांगितले की, येथील इंदिरा पाझर तलाव फोडून समाजकंटकांनी यातून काय साध्य केले माहीत नाही. अशा व्यक्तींना शोधून त्यांच्यावर योग्य ती कक कारवाई पोलिसांनी करावी. या पाझर तलावातील पाण्यावर तीन गावातील सुमारे दहा हजार नागरिक अवलंबून होते शिवाय मोर, लांडगे, रानडुक्कर, ससे आदी वन्यप्राण्यांचे पाण्या अभावी जीवन धोक्‍यात आले आहे. निवडणुकीचा राग मनात धरून असे कृत्य कोणी करीत असेल तर त्याला कोणीही पाठीशी घालू नये. समाजापेक्षा कोणतीही व्यक्ति मोठी नाही, समाजहित महत्वाचे आहे. म्हणून असे कृत्य करणाऱ्याला शासन झालेच पाहिजे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)