निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज

पिंपरी – गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सज्ज झाले आहे. पोलीस खाते महापालिकेशी समन्वय साधून शहरात फौजफाटा तैनात करणार आहे. सर्व गणेश मंडळांनी धर्मादाय आयुक्तालयाच्या नियमानुसार नोंदणी करणे अपेक्षीत आहे. अन्यथा नियमांचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करण्यात होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

रानडे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार रस्त्याच्या एक तृतीयांश भागातच गणेश मंडळाला मंडप टाकण्यास परवानगी आहे. तसेच हा मंडप रस्त्याच्या वाहतुकीच्याच दिशेने असायला हवा. यावेळी कोणतीही वाहतूक कोंडी होता कामा नये, तसेच सिग्नल व चौकात किमान शंभर फुटापर्यंत गणपती मंडळांनी मंडप टाकावा, मंडपामुळे कोठेही वाहतूक कोंडी झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच ध्वनीप्रदुषणावरही पोलिसांचे नियंत्रण असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे पोलीस आयुक्तालयाप्रमाणे विघ्नहर्ता न्यासचीही पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात स्थापना होणार आहे. गणेश मंडळांच्या सर्व पोलीस ठाण्याच्या पातळीवर बैठका सुरु आहेत. कोणी नियमाबाहेर जाऊन मंडळाची नोंदणी नसताना नागरिकांकडून बळजबरीने वर्गणी गोळा करत असेल तर त्या मंडळांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांच्या बैठका संपताच मंडळांची आयुक्तालय पातळीवर लवकरच बैठक घेण्यात येईल. यामध्ये त्यांना नियम व त्यांच्या कर्तव्याची माहिती देण्यात येईल, असेही रानडे यांनी स्पष्ट केले.

…अन्यथा दहीहंडी आयोजकांवर बडगा
गणपती, दहीहंडी, गणेश विसर्जनासाठी पोलिसांच्या बैठका सुरु आहेत. यामध्ये गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था व मंडळांवर नियंत्रण याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये दहीहंडीसाठीही संबंधीत मंडळाने ती एखाद्या मैदानावरच करावी, तसेच त्यांनी दहीहंडीची उंची ही मर्यादीत ठेवावी. त्यांच्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास दहीहंडी आयोजकांवर कारवाई करण्यात येईल. याबरोबरच गर्दीच्या काळात सोनसाखळी चोरी, वाहन चोरी किंवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल ओतून काम करणार आहे. नागरिकांनीही या काळात कोणता गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे पोलीस त्यांना नक्कीच मदत करतील, अशी ग्वाही अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)