निर्विघ्नम कुरू मे देव सर्व (शुभ) कार्येषुसर्वदा।। 

अश्‍विनी महामुनी 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। 
निर्विघ्नम कुरू मे देव सर्वकार्येशुसर्वदा।। 
लहानपणी संध्याकाळी सांजवात केल्यानंतर देवापुढे उभे राहून हात जोडून “शुभम करोति कल्याणम आरोग्यमधनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योति नमोस्तुते।। असे आमची आई आम्हाला म्हणायला लावायची. नुसते शुभं करोति नाही, तर त्याच्यानंतर रामरक्षा-मारुतीस्तोत्र, मनाचे श्‍लोक आदी अनेक श्‍लोक-स्तोत्रे म्हणायला लावायची. खरं तर म्हणायला लावायची असे म्हणणे बरोबर नाही. त्यात जोरजबरदस्ती काहीही नव्हती. लहानपणीच एकदा सवय लागल्यानंतर आम्ही भावंडे स्वत:हून अगदी आवडीने-भक्तिभावाने ते सारे म्हणत असू.अगदी मोठे झालो, हायस्कूलला गेलो तरीही हा परिपाठ कधी चुकला नाही. आजही संध्याकाळी मी न चुकता सांजवात करते, माझा मुलगा इंग्लिश मीडियमला असूनही शुभम करोती वगैरे अगदी खुशीने म्हणतो.

संध्याकाळच्या वेळी आईने देवापुढे निरंजन लावले, अगरबत्त्या लावल्या, धूपपात्रात धूप टाकला की घरातील वातावरणाला एक मांगल्य येत असे. घरभर अगरबत्तीचा-धुपाचा सुगंध दरवळत असे. तेव्हा सातच्या आत घरात हा संस्कार होता. लादलेला नियम नव्हता. संध्याकाळच्या वेळी दिवसभर आकाशात स्वच्छंद फिरणारी पाखरे संध्याकाळी घरट्याच्या ओढीने झेपावीत, तशी माणसेही आपापल्या घराच्या ओढीने घरी परतत असत. घरातील माणसे येणाऱ्याच्या वाटेकडे डोळे आणि कान लावून बसत असत. आपले माणूस आल्याची त्या काळी चाहूल लागत असे. शाळा सुटल्यावर संध्याकाळचा दिवेलागणीपर्यंतचा वेळ आम्हाला खेळण्यासाठी मोकळा असायचा. आम्ही भावंडे संध्याकाळी खेळून घरी आलो की हातपाय धुवायचो आणि घरात बसायचो. सारेच कुटुंब त्या काळी संध्याकाळचे घरात असायचे. त्यात घराला घरपण यायचे. घरातील माणसांमध्ये जिव्हाळा असायचा. आता चारच माणसांचे कुटुंब असले तरी चौघांची तोंडे चार दिशांना असा प्रकार असतो. घरातील सर्वजण एकत्र असण्याचे दिवसातले चार तासही नसतात. जर परस्पर सहवासच नाही, तर मग प्रेम-जिव्हाळा कोठून येणार. तेव्हा घरातील मुक्‍या प्राण्यांबद्दलसुद्धा जिव्हाळा असायचा.

संध्याकाळच्या वेळी शुभम करोति म्हणून झाल्यानंतर परवचा म्हणून अभ्यास करत बसायचो आम्ही. रात्री आठ साडेआठला जेवण व्हायचे तेव्हा. आजोबा, वडील आम्ही भावंडे एका पंक्तीला बसत असू. आई आणि आजी नंतर बसत. जेवणानंतर रात्री एकत्र बसून बराच वेळ गप्पागोष्टी होत असत. कधी कधी सर्वजण अंगणात एकत्र बसत असत. आज मागे वळून पाहिले तर जाणवते, की किती छान होते ते दिवस. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते….. हे म्हणण्यात त्या बालवयातही केवढे समाधान होते. अर्थ फारसा कळत नसला तरीही नकळत काहीतरी चांगल्या भावना निर्माण व्हायच्या त्यातून. त्यातला खरा अर्थ आज समजतो. आज त्याची जाणीव होते आणि उणीवही जाणवते.

शुभम करोति मधील प्रत्येक शब्दच अर्थपूर्ण आहे. त्याच्या उच्चारातही सामर्थ्य आहे. आज तर त्यातील प्रत्येक शब्द फारच अर्थपूर्ण वाटतो. मनाला भिडतो. आज त्याची गरज कमालीची जाणवते. तेव्हा दररोज संध्याकाळच्या शांत-पवित्र वातावरणात, धूप-अगरबत्तीच्या सुगंधात अगदी मनापासून म्हटलेल्या त्या प्रार्थनांचा परिणाम मनावर खोलवर होत असे. तेव्हाच्या त्या सायंप्रार्थनेने “शत्रुबुद्धी विनाशाय’ हे मनावर बिंबून जात असे आणि मग आचरणातही येत असे. आज किती घरात? निदान शहरातील तरी, किती घरात संध्याकाळच्या वेळी घरातील सर्व मंडळी घरात असतात? एकत्र असतात? किती घरात संध्याकाळच्या वेळी देवापुढे आठवणीने-भक्तिभावाने दिवा लावला जातो? मुलांना शुभम करोति कल्याणम म्हणायला लावले जाते? श्‍लोक, स्तोत्रे, मंत्र म्हणायला लावले जातात. वडीलधाऱ्यांना आदरपूर्वक नमस्कार करायचे वळण लावले जाते?

मला वाटते या सर्व प्रश्‍नांचे उत्तर बरचसे नकारार्थीच असेल. आजचे धावपळीचे गडबडगोंधळाचे जीवन गेल्या काही वर्षात टीव्हीवरील विविध चॅनल्सनी त्यावरील भडकतडक मालिकांनी बिघडवायला सुरुवात केली आहे. ज्या काळात टेलिव्हीजनवर एकच एक दूरदर्शन होते तेव्हा कार्यक्रमात भारतीयत्व होते. कार्यक्रमात विविधता होती, पण त्यात बरेच काही संस्कार करणारे, विचार करायला लावणारे कार्यक्रम होते. मला आठवते, रामायण मालिका चालू होती तेव्हा रविवारी सारा भारत रामायणात रमलेला असायचा. रस्ते सुनसान असायचे. पुण्यातला लक्ष्मी रोडही रविवारी रामायणाच्या वेळेत अगदी ओसाड पडलेला म्हणतात तसा सुनसान असायचा. त्याकाळात कळत नकळत रामायणाने लोकांच्या मनात आणि एकूणच वातावरणात पावित्र्य निर्माण करण्याचे काम केले होते. आताचे हे शेकडो चॅनल्स काय करतात? कोणत्या भावना जागवतात? आज भारतात आणि जगभरातही जी विविध कांडे घडत आहेत, हिंसाचार होत आहे, त्याला काही प्रमाणात कारण हे टीव्ही चॅनल्स आणि हातातला तो मोबाईल आहे यात फारसे दुमत नसावे.

आजकाल टीव्हीचॅनल्समध्ये मन बिघडवणाऱ्या, मनाला विकृत करणाऱ्या परस्पर प्रेमाची-जिव्हाळ्याची एकपणाची भावना नष्ट करून स्वार्थ पेरणाऱ्या कार्यक्रमांची रेलचेल झाली आहे. यात सर्वात आपले भारतीयपण हरवत चालले आहे असे मला तर फार प्रकर्षाने जाणवते. आणि आता तर टीव्ही चॅनल्स तरी बरे होते असे म्हणायची वेळ या मोबाईलने आणली आहे. त्यातील नेटने आणली आहे. तुम्हीही पाहतच असाल. घरीदारी-बाजारी… सर्वत्रच. हाताला एखादा नवीन अवयव फुटल्यासारखा सतत मोबाईल हातात असतो. कानाला ईयरफोन लावलेले असतात आणि एकाग्र चित्ताने त्यावरील कार्यक्रम पाहणे चालू असते. रोज एक जीबी फ्री याने तर फारच घोटाळा करून टाकलेला आहे. तो एक जीबी वाया जाऊन द्यायचा नाही, वापरायचाच म्हणून सतत मोबाईलमध्ये डोळे, कान आणि मन खुपसून बसलेली असंख्य मंडळी आपण पाहतो. बसमधून जाताना त्या गर्दीत धक्के खात असतानाही ती एकाग्रता भंग पावताना दिसत नाही. त्यातून काय पेरले जाते हे जगजाहीर आहे.

आता क्रिकेटसारखा खेळही अभिमान वाटावा असा खेळ राहिलेला नाही. तो खेळच राहिलेला नाही, मग जंटलमन गेम’ कोठून राहणार? त्यातला खिलाडूपणा दूर गेला आहे. त्याचा व्यवसाय-धंदा झाला आहे. त्यात देशाभिमान वगैरे राहिलेलाच नाही. आयपीएल बाजार झाला आहे आणि त्यातील चीअरगर्ल्सनी त्याला हिणकसपणा आणलेला आहे. त्या अपुऱ्या कपड्यातील चीअरबालांचे अविर्भाव आणि हालचाली आयपीएलच्या भरल्या बाजारात कसल्या भावना निर्माण करतात? ही कोणा सडक्‍या मेंदूची कल्पना आहे देव जाणे. साध्या परीक्षेला ड्रेस कोड लादणारांना त्याचे काही वाटत नाही. त्याचे कोणालाच काही वाटत नाही. त्यावर बंदी आणावी असेही वाटत नाही.

नेमके ऐन परीक्षेच्या काळातच हे आयपीएल सामने चालू होतात. युवा पिढीबद्दल भरभरून बोलणाऱ्या सरकारलाही परीक्षा आणि सामने एकत्र येऊ नयेत असे वाटत नाही. संध्याकाळ्च्या वेळी आयपीएलचा बाजार भरल्यावर कसली सांजवात आणि कसले शुभम करोती. खरं तर पूर्वीपेक्षाही आज त्याची फार गरज आहे. शुभ कर, कल्याण कर म्हणण्याची. शत्रुबुद्धी विनाशाय असे म्हणण्याची तर नितांत गरज आहे. आज जगात सर्वत्र शत्रुत्वाची भावना वाढलेली आहे. शत्रुबुद्धी विनाशाय ऐवजी नुसते “विनाशाय’ च दिसते आहे, ऐकू येते आहे. तेव्हा निर्विघ्नम कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा ऐवजी शुभ कार्येषु -चांगल्या कामात निर्विघ्न कर असे म्हणण्याचे दिवस आलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)