निरंतर लैंगिक सुखासाठी कुटुंबनियोजन

निरोगी विवाहित जोडप्याला आपल्या भावी संसाराच्या दृष्टीने विचारपूर्वक काही योजना आखता आल्या तर त्याचे कौटुंबिक जीवन जास्त सुखाचे व समाधानाचे होऊ शकेल. त्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टी शक्‍य असतील तर लग्न होण्यापूर्वीच पती-पत्नीच्या विचाराने व डॉक्‍टरांच्या सल्ल्याने निश्‍चित करता येईल.

1) लग्नानंतर किती दिवसांनी पहिले मूल व्हावे?
2) दोन मुलांमध्ये किती अंतर असावे?
3) एकूण किती मुले असणे परवडेल ?

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ह्या प्रमुख प्रश्‍नांच्या अनुरोधाने विचार केला पाहिजे. लग्नाच्या वेळी पती-पत्नी वयाने लहान असतील तर मूल होण्यापूर्वी लग्नानंतर थोडी वर्षे मध्ये जाणे हेच केव्हाही चांगले; पण जर उशिरा लग्न होत असेल तर निसर्ग देईल त्याच वेळी आपण मुलाचा स्वीकार करणे चांगले. प्रत्येक जोडप्याची संततिनिर्माणक्षमता ही वेगवेगळी असते. काही जोडपी लैंगिक सुख व्यवस्थित घेत असली, तरी त्यांचा पाळणा मुळातच अंतराअंतराने असतो, म्हणजे त्यांची संततिनिर्माणक्षमता कमी असते; पण काही जोडप्यांना मात्र फार लवकर मुले होऊ शकतात.

पूर्वी मुले होण्याचा काळ, दोन मुलांतील अंतर, एकूण मुलांची संख्या ही बहुधा निसर्गावरच सोपविलेली असे. त्याबाबतीत पती-पत्नीनी विचारपूर्वक काही योजना आखली पाहिजे, याची जाणीव सर्वसामान्य लोकांना नव्हतीच. काही जोडपी मात्र तीन-चार प्रकारांनी संततीची संख्या मर्यादित करण्याचा प्रयत्न करीत. विवाहानंतर पहिली काही वर्षे लैंगिक सुख मनाजोगे घेत राहायचे. निसर्ग देईल, तेव्हा संतती होत असायची. अपेक्षित संतती पूर्ण झाली की, ह्यानंतर मात्र स्त्रीची जननक्षमता संपेतो दोघांनी अजिबात लांब राहायचे. जेव्हा संतती हवी; तेव्हाच फक्‍त संबंध ठेवायचा. एरवी स्वत:वर पूर्ण नियंत्रण ठेवायचे. सुरक्षित काल विचारात घेऊन संबंध ठेवणे किंवा संबंध आल्यानंतर शुक्रजंतूंचा प्रवेश योनिमार्गात होणार नाही, याबद्दल खबरदारी घेणे.

गर्भपात- वरीलपैकी कोणतीही योजना सफल झाली नाही, तर नाइलाजाने गर्भपात हा धोक्‍याचा मार्ग पत्करायचा. हे सारे प्रकार तितकेसे चांगले नाहीत. संततीच्या भीतीने पत्नी पतीला टाळू लागली तर संसारात चिडचीड, त्रासिकपणा निर्माण होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी पती संयमी असेल व जबाबदारीची जाणीव असणारा असेल तर तो आपल्या पत्नीस सहकार्य करील; पण जर पतीला संयम ठेवणे अशक्‍य असेल तर तो घराबाहेर लैंगिक इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न करील व त्यामुळे त्या कुटुंबाला अनेक आपत्तींना तोंड देणे भाग पडेल. पूर्वी संततिनियमनाचे इतर मार्ग माहीत नसल्याने या मार्गाचा अवलंब लाखो कुटुंबे करीत असत. ज्यांच्या अविचारीपणामुळे संततीला मर्यादा नसे. अशा कुटुंबात स्त्रियांच्या प्रकृतीवर त्याचे दुष्परिणाम दिसत व बालमृत्यूचे प्रमाण वाढत असे.

हल्ली नवीन निघालेल्या शोधांमुळे प्रत्येक जोडप्याला संतती ही आपल्या इच्छेनुसार होऊ शकते. जेव्हा पती-पत्नी दोघांनाही आपल्याला मूल असावे, असे वाटत असेल अशा वेळी त्यांच्या इच्छेनुसार दोघांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून जर मुलाचा जन्म झाला, तर तो केव्हाही हितकारक. स्त्रीच्या मनाविरुद्ध मातृत्व तिच्यावर लादले गेले तर त्याचे दुष्परिणाम त्या गर्भावर व पुढे त्या बालकावर दिसून येतात. गर्भसंभवाचे वेळी पती-पत्नी हे दोघेही आनंदात असली पाहिजेत. एकमेकांवर अनुरक्‍त असली पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला मूल व्हावे, ही इच्छा दोघांच्याही मनात असेल तर जन्मणारे मूल चांगले निपजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)