नियोजनबद्ध अभ्यास केल्यास मोठे यश!

डॉ. सीमा मोरे : नूतन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

तळेगाव दाभाडे – प्रत्येक दिवस हा अभ्यासासाठी महत्त्वाचा असतो. कुतूहल आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास उत्तम गुणवत्ता निर्माण होऊ शकते. या चार वर्षांमध्ये गुणवत्ता निर्माण करायची असल्यास प्रामाणिकपणे कष्ट करा. नियोजनबद्ध अभ्यास केल्यास मोठे यश मिळते, असे प्रतिपादन 1993 बॅचच्या बारावी सायन्स शाखेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या डॉ. सीमा मोरे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित नूतन अभियांत्रिकीतील प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सीमा मोरे बोलत होत्या. संस्थचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, सहसचिव नंदकुमार शेलार, महाराष्ट्र नॅचरल गॅसचे संचालक राजेश पांडे, संस्थेचे विश्वस्त राजेश म्हस्के, महेशभाई शहा, चंद्रकांत शेटे, यादवेंद्र खळदे, गणपत काळोखे, संस्थेचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे, डॉ. हरीश तिवारी, डॉ. ललितकुमार वधवा, प्रा. रामदास बिरादार आदी उपस्थित होते. मागील वर्षी उत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच या वर्षी प्रवेश घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

बाळा भेगडे यांनी पालकांशी संवाद साधताना, आमचे विद्यार्थी हे आमच्या साठी व्हीआयपी आहेत, असे मत मांडले. गुणवत्तापूर्ण अभियंते तयार करणे हे नूतन अभियांत्रिकीचे ध्येय आहे आहे, असे पुढे बोलताना ते म्हणाले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस कॉर्पोरेशनचे राजेश पांडे म्हणाले, महाराष्ट्र सरकारने जे औद्योगिक आस्थापनांशी करार केले आहेत, त्यातील सर्वाधिक करार तळेगाव, पिंपरी-चिंचवड परिसरात आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची समस्या राहणार नाही.

कृष्णराव भेगडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगून कौशल्य विकसना मधील संस्थेचे उपक्रम या विषयीची माहिती सांगितली. डॉ. गिरीश देसाई यांनी आगामी काळातील संस्थेच्या योजनांची माहिती दिली. संस्थेचे करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांनी अभियांत्रिकीतील चार वर्षातील कालखंडाला समोर जाताना कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली. पालक प्रतिनिधी भाऊसाहेब कोकाटे, डॉ राजेंद्र कानफाडे यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रा. रामदास बिरादार यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अर्चना येवले आणि प्रा. स्मिता मोदी यांनी केले. तर प्रा. प्रेमा सहाणे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)