सोरतापवाडीत तरूणाचा जागीच मृत्यू : चौघे जखमी
लोणी काळभोर- भरधाव वेगाने चाललेल्या आय ट्वेंटी कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार पुणे-सोलापूर महामार्गाचा दुभाजक ओलांडून समोरुन येणाऱ्या अल्टिस कारवर जोरदार आदळून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथील श्रीराज नर्सरीजवळ बालाजी वजन काट्यासमोर मंगळवार (दि.5) रोजी रात्री 12.10 मिनिटांनी घडला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ंयातील दोन गंभीर जखमी आहेत. अमोल रोहिदास काटे (वय 32, रा. आळंदी, ता. खेड), असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव श्रीराम वाडेकर, शुभम हिरामण गोरडे, ज्ञानेश्वर हरिभाऊ राहिल, स्वप्नील एकनाथ वहिले (सर्व रा. आळंदी, ता. खेड) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीहून पुणे-सोलापूर महामार्गाने आय ट्वेंटी (एम.एच.14 ई.एच. 1827 ) ही कार सोलापूर दिशेला जात होती. कार चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटून सोलापूरमार्गे पुण्याला जाणाऱ्या कोरेला अल्टिस कारला (एमएच.13 ए.सी.8497) आय ट्वेंटी कार दुभाजक ओलंडून समोरासमोर जोरदार आदळून झालेल्या अपघातात आय ट्वेंटी कारने पलटी घेतली. या धडकेत आय.ट्वेंटी कारमध्ये ड्रायव्हरशेजारील आसनावर बसलेल्या अमोल काटे या तरुणाला डोक्याला गंभीर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चौघे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने लोणीकाळभोर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा