निमगाव म्हाळुंगीमध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान

तळेगाव ढमढेरे- निमगांव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत शेतकरी प्रशिक्षण आणि शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात शेतीचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेतीचे उत्पन्न अधिक मिळण्यासाठी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार पिकांना शिफारशीत खतांच्या मात्रा देणे, सेंद्रिय आणि जिवाणू खतांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारून पिकांची उत्पादकता वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करण्याबाबत कृषी सहाय्यक मेघराज वाळुंजकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. या कार्यक्रमात कृषी साहायक अशोक जाधव यांनी शेतकऱ्याना उसाचे एकरी 100 टन उत्पादन मिळण्यासाठी उसाचे बेणे निवड, बेणे प्रक्रिया, रासायनिक खतांचा संतुलित वापर, बेणे लागवड तंत्र, शेणखत, जिवाणू खत, हिरवळीच्या खतांचा वापर, सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर, पाणी नियोजन, कीडरोग उपाययोजना, हुमणी किडीच्या नियंत्रणाबाबत सखोल मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी शिक्रापूर वसंतराव बांगर यांनी कृषी विभागाच्या सर्व योजनांची सविस्तर माहिती देताना जमीन आरोग्य पत्रिकाअंतगरत माती तपासणी, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, ठिबक आणि तुषार सिंचन, शेतकरी अपघात विमा, खरीप पीक विमा, फळपीक विमा योजना, खरीप बाजरी आणि तूर पिकाचे प्रकल्प राबवणे यांबाबत शेतकरी गटास सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग, सरपंच रेश्‍मा काळे, कृषी मित्र राजेंद्र विधाटे, सोसायटीचे चेअरमन दादा रणसिंग, माजी उपसरपंच तेजस यादव, प्रगतशील शेतकरी आणि इतर शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भुईमूग पिकाच्या प्लॉटला भेट देऊन शेतकरी वर्गास मार्गदर्शन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)