निधी असूनही भामचंद्र डोंगराची बिकट वाट

संरक्षणात्मक लोखंडी रिलींग मोजताहेत शेवटच्या घटका

शिंदे वासुली-श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगरावर अनेक अत्यावश्‍यक सुविधांची आवश्‍यकता आहे. प्रामुख्याने डोंगरावरील शिवमंदिरापासून संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालेल्या प्राचीन गुहेतील विठ्ठल-रखुमाई मंदिराकडे जाण्यासाठी दगडातील कोरीव पायऱ्यांलगत असलेली संरक्षणात्मक लोखंडी रिलींग जीर्ण होऊन शेवटच्या घटका मोजत आहे.

संतशिरोमणी तुकाराम महाराजांची तपोभूमी व साक्षात्कार भूमी म्हणजे श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर. डोंगरावर प्राचीन संस्कृतीची महती सांगणाऱ्या दगडातील कोरीव गुहा आहेत. याशिवाय प्राचिन स्थापत्यकलेचे दर्शन येथील पवित्र शिवलिंग मंदिरात घडते. येथील प्राचीन महादेव मंदिर डोंगर परिसरातील शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी, वराळे, आंबेठाण, खालूंब्रे, कोरेगाव, शेलू – आसखेड आदि गावातील भाविकांचे प्रमुख आराध्य दैवत आहे.

श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर वनपरिक्षेत्रात येतो. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसर विकास प्रक्रियेला मर्यादा येतात; परंतु तीर्थक्षेत्रस्थळी मुलभूत अत्यावश्‍यक सोयीसुविधा पुरवणे, येणाऱ्या भाविकांसाठी सेवा देणे, देखभाल दुरुस्ती, डागडूजी करणे, लाईट व पथदिवे लावणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, स्वच्छता व साफसफाई करणे आदि कामांसाठी पुणे जिल्हा परिषदेकडून तिर्थक्षेत्र विकास निधी दिला जातो. डोंगरावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वासुली ग्रामपंचायतीला हजारो रुपये निधी मिळतो.

डोंगरासाठी ग्रामपंचायत वासुली, भामचंद्र डोंगर सप्ताह समिती व भामचंद्र डोंगर व परिसर विकास समिती ही स्वंसेवी संस्था, अशा तीन संस्था काम करतात; परंतु अत्यावश्‍यक मुलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यात अपयशी झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, भामचंद्र डोंगर सप्ताह समितीच्या वतीने डोंगरावर स्वच्छता, लाईट व दर्शनमार्ग दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असल्याचे समितीचे कार्यकर्ते व भांबोलीचे माजी सरपंच किसन पिंजण यांनी सांगितले. याकामी भांबोली ग्रामपंचायतीचे सरपंच सागर निखाडे सहकार्य करत आहेत.

  • …तर निधी अन्य ग्रामपंचायतीकडे वर्ग करा
    तीर्थक्षेत्र विकास निधीचा योग्य नियोजन करून सोयी सुविधा पुरवण्याची मागणी करताना वासुली ग्रामपंचायतीला डोंगरावर काम करण्यास उत्सुक नसेल तर तीर्थक्षेत्र निधी परिसरातील अन्य ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×