निद्रा : आरोग्याचा एक स्तंभ (भाग २)

आपल्या लक्षात असेलच की आरोग्याच्या तीन पायांपैकी, तीन आधारांपैकी निद्रा हा एक पाय, एक आधार. रोजच्या कामामुळे, दगदगीमुळे शरीर, मन थकून जाते. निद्रेमुळे या थकलेल्या शरीर-मनाला पुन्हा तरतरी येते. नवा उत्साह येतो. थोडक्‍यात रोज झालेली झीज भरून निघते. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणे आरोग्य टिकविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 

एक सॉफ्टवेअर क्षेत्रातला तरुण. दिवस-रात्र काम करणारा. झोप म्हणजे काय विसरूनच गेलेला. माझ्याकडे एकदा आला. त्याच्याकडे तक्रारींची मोठी लिस्ट. सर्व तक्रारी वात-पित्ताच्या. मी त्याला बघत होतो. त्याची अवस्था अशी होती की, त्याला समोरच्या टेबलावर डोके टेकून झोप म्हटले असते तर एका सेकंदात झोपी गेला असता. झोप त्याच्या डोळ्यात मावत नव्हती.

त्याला चक्क प्रिस्क्रिप्शन्‌ लिहून दिले की, घरी जाऊन झोपायचे व झोप पूर्ण करूनच उठायचे. मग 24 तास लागोत का 36 तास. मुख्य म्हणजे एकही औषध दिले नाही. आणि त्यानेसुद्धा तसेच केले. घरी जाऊन चांगला 24-25 तास झोपला. जागा झाल्यावर त्याचा मला फोन आला की एकदम फ्रेश वाटत आहे. शरीराची एकसुद्धा तक्रार शिल्लक राहिली नाही. खरं तर तो जेव्हा माझ्याकडून निघाला असेल तेव्हा मनामध्ये दुसऱ्या चांगल्या डॉक्‍टरांना दाखवून घ्यावे असा विचार करूनच गेला असेल. असले कसले प्रिस्क्रिप्शन्‌ की झोपा भरपूर. पण, आता मात्र त्याला पूर्णपणे पटले की झोप किती महत्त्वाची आहे ते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशाच एक अमेरिकेतील बाई. त्यांच्याही तक्रारी वात-पित्ताच्या. जेव्हा त्यांना त्यांच्या दिनक्रमाविषयी सविस्तरपणे विचारले, तर आश्‍चर्यच वाटले. एकदमच योग्य दिनक्रम. पहाटे पाचला उठून तयार होऊन आठला ऑफिस गाठायचे आणि ऑफिसमधून संध्याकाळी पाचला घरी यायच्या. वा! ऐकून एकदम बरे वाटले. विचार केला आता बाई लवकर जेवण आटपून लवकर झोपी जातील. पण, इथे अंदाज चुकला. त्या बाई थोडा आराम करून, तयार करून संध्याकाळी 7.30-8 ला करमणुकीसाठी क्‍लबमध्ये जायच्या. यायला वाजायचे बारा. म्हणजे जेमतेम झोप पाच तास आणि असे चालले होते अनेक वर्षे.

त्यांना विचारता विचारता असे वाटले की, त्यांचे वय साधारण 45-50 च्या दरम्यान असावे. चेहऱ्यावर, हातावर किचिंत सुरकुत्याही दिसत होत्या. पण, वय निघाले 36-37 च्या दरम्यान. थोडक्‍यात म्हणजे त्या त्यांच्या वयापेक्षा जास्त मोठ्या दिसत होत्या. त्याचे कारणसुद्धा माझ्या समोरच होते. त्याची अत्यंत अपुरी अशी झोप. वर्षोनुवर्षे अशाच पद्धतीने झोपल्या होत्या. रोजच शांत न होणाऱ्या वाताने भंडावले होते त्यांना. ज्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य हवे असेल त्यांनी पुरशी झोप घेणे अत्यावश्‍यक आहे.

वरील सर्व माहिती वाचून आता तुमच्या लक्षात आले असेल की, झोपेला इतके महत्त्व का दिले आहे ते. एकीकडे अशी झोपेची आबाळ करणारे अनेक माणसे सध्या दिसत असतात. दुसरीकडे अनेक कुंभकर्णही दिसतात. जसे कमी झोप वाईट, तशीच जास्त झोपही दुष्परिणामांनी भरलेली. गरजेपेक्षा जास्त झोपेने शरीरात जडपणा येईल. आळस येईल. वजन वाढेल. थोडक्‍यात कफाचे सर्व आजार शरीरात घर करतील. आठवून बघा ना, जास्त झोपून उठल्यावर कसे वाटते ते! डोके जड, डोळे आळसावलेले. शरीर जड.

तर तुमची झोपेची गरज तुम्ही ओळखा व त्यानुसार वागा. कमी पण नको व जास्त सुद्धा नको. यथायोग्य हवी. म्हणूनच आयुर्वेदाचार्य म्हणतात, मध्यम मार्ग महत्त्वाचा. सध्या आपल्याला असे अनेक आरोग्याचे मार्ग दिसतात की ते एका क्षणभर मोहक वाटतातपण सरतेशेवटी आपले नुकसान करतात. आणि हो, आपल्याबरोबर इतरांचीही झोपेची गरज ओळखा व त्यांना त्यांची झोप ठरवू द्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)