निद्रा : आरोग्याचा एक स्तंभ (भाग १)

आपल्या लक्षात असेलच की आरोग्याच्या तीन पायांपैकी, तीन आधारांपैकी निद्रा हा एक पाय, एक आधार. रोजच्या कामामुळे, दगदगीमुळे शरीर, मन थकून जाते. निद्रेमुळे या थकलेल्या शरीर-मनाला पुन्हा तरतरी येते. नवा उत्साह येतो. थोडक्‍यात रोज झालेली झीज भरून निघते. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणे आरोग्य टिकविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 

 

आता पुरेशी म्हणजे नेमकी किती? पाच तास, सहा तास, सात की आठ तास? इथे पुन्हा एकदा आपल्या शरीराला विचारावे लागेल जसे प्रत्येकाची तहान निराळी, भूक निराळी त्याचप्रमाणे प्रत्येकाची झोपेची आवश्‍यता निराळी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोणाला पाच तास झोप पुरेल तर कोणाला आठ तास झोप पुरेशी ठरेल. त्याची प्रकृती, शरीराची जडण-घडण, त्याच्या कामाचे स्वरूप, राहण्याचा प्रदेश अशा अनेक गोष्टींवर त्यांची झोप ठरेल. शरीर-मन मजबूत तर झोपेची गरज कमी. शरीर-मन दुर्बल तर झोपेची गरज जास्त. थंड प्रदेशात कमी तर उष्ण प्रदेशात जास्त, शारीरिक काम कष्टाचे तर झोपेची गरज जास्त, बैठे काम तर गरज कमी.

त्यामुळे किती झोप घ्यावी हे ज्याने त्याने ठरवावे. एक मात्र नक्की की सकाळी उठल्यावर फ्रेश वाटले पाहिजे. ताजेतवाने वाटले पाहिजे. असे वाटणे म्हणजेच आपली झोप पूर्ण झाली. थकवा निघून गेला. आता काम करायला शरीर पुन्हा तयार.
त्याप्रमाणे अनेक कारणांमुळे आपली तहान भूक बदलत राहाते. त्याचप्रमाणे आपली झोपेची गरजसुद्धा बदलत रहाणार. आपले कामाचे स्वरूप बदलले, कामाचे ठिकाण बदलले, वय वाढले अशा अनेक कारणाने आपली झोपेची गरज बदलत जाईल. आपण त्यानुसार बदलणे महत्त्वाचे. कधी जास्त झोप लागेल तर कधी कमी.

शरीराच्या गरजेपेक्षा झोप कमी पडली तर शरीरात पित्त व वात हे दोन घटक वाढतील व त्यामुळे होणारे सर्व आजार शरीरात घर करतील. गाडी दिवसभर पळवली, तिचे इंजिन गरम झाले, घरी आल्यावर पार्किंगमध्ये लावली पण इंजिन चालूच ठेवले तर ते थंड होणारच नाही. गरमच राहील. त्याचप्रमाणे ही शरीराची गाडी जर रात्री बंद केली नाही तर गरमच राहील. म्हणजेच पित्त वाढेल, उष्णता वाढेल. तसेच या थकलेल्या शरीराला विश्रांती मिळाली नाही तर त्याचा थकवा टिकून राहील आणि थकवा म्हणजेच वाढलेला वात. अशा रितीने झोप कमी झाल्यास वात-पित्ताचे व्याधी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)