निगडी-दापोडी बीआरटीचे भवितव्य गुरुवारी ठरणार

पिंपरी – निगडी-दापोडी रस्त्यावरील बीआरटी बस मार्ग सुरू करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर येत्या गुरुवारी (दि. 2) अंतिम सुनावणी होणार आहे. त्यावर या मार्गावरील बीआरटीचे भवितव्य अवलंबून असून शहरवासियांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत (जेएनएनयूआरएम) महापालिकेने बीआरटीएस प्रकल्प हाती घेतला. शहरातील सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी तसेच शहरवासियांना जलद, कार्यक्षम बससेवा देण्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. बीआरटीएस कॉरिडॉर विकासासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यापैकी साडेबारा किलोमीटरचा पुणे-मुंबई रस्ता, साडेचौदा किलोमीटर लांबीचा औंध-रावेत रस्ता, 11.20 किलोमीटर लांबीचा नाशिकफाटा-वाकडरस्ता आणि काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी रस्त्यांवर बीआरटीएस योजना राबविण्यात केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मात्र, मागील दहा वर्षात केवळ दहा वर्षात फक्त औंध – रावेत आणि नाशिक फाटा ते वाकड हे दोनच मार्गच अंशत: सुरु झाले आहेत. दापोडी-निगडी हा मार्ग सुरुवातीपासून वादात सापडला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मार्गावरील सुरक्षिततेच्या मुद्‌द्‌यावरून ऍड. हिंमतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यानंतर महापालिकेने आयआयटी पवई यांची नियुक्ती करून सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना मागविल्या. त्याची अंमलबजावणी केली. न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने याचिकाकर्त्यासोबत या मार्गाची पाहणी 24 व 25 एप्रिल रोजी केली. त्यानंतरचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केला होता. त्या संदर्भात 12 जुलैला सुनावणी झाली. त्या वेळी पुन्हा पाहणी करण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यानुसार, महापालिका, पीएमपीएमएल, वाहतूक पोलीस यांचे अधिकारी आणि याचिकाकर्ते ऍड. जाधव यांनी पुन्हा चाचणी घेतली. महापालिकेने त्याचा अहवाल 26 जुलै रोजी न्यायालयात सादर केला आहे. त्यावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.

सव्वा लाख प्रवाशांना फायदा
न्यायालयाने बीआरटी सुरू करण्याचा आदेश दिल्यास, ऑगस्टमध्ये निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटी बससेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होतील. त्याच वेळी पुणे महापालिकेनेही पुणे-मुंबई रस्त्यावर खडकी ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय चौकादरम्यान बीआरटीचे बस थांबे बांधण्यास सुरवात केली आहे. येत्या वर्षभरात ते काम झाल्यास, सुमारे वीस किलोमीटर अंतरातून बीआरटी बस सेवा सुरू होईल. बीआरटी बस सेवा सुरू झाल्यास, सुमारे सव्वा लाख प्रवाशांना बससेवेचा फायदा होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)